Breaking News

नाताळ, नववर्षानिमित्त शिर्डी महोत्सव


शिर्डी/ प्रतिनिधी ः
साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ, नववर्षानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर 31 डिसेंबर 2019 रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. ही माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुगळीकर यांनी सांगितले की, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्‍या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणा-या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने 31 डिसेंबरला श्रींचे समाधीमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरची शेजारती व 1 जानेवारी 2020 रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे 25 डिसेंबर, मंगळवारी 31 डिसेंबर व बुधवारी 1 जानेवारी 2020 रोजी असे तीन दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील. याबरोबरच मंगळवारी 31 डिसेंबर व बुधवारी 1 जानेवारी 2020 रोजी दोन दिवस वाहन पूजा बंद राहतील.  मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही मुगळीकर यांनी केले आहे.
            हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुगळीकर व सर्व विश्‍वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.