Breaking News

बेघरांना निवार्‍याचा मूलभूत अधिकार मिळावा : अ‍ॅड.गवळी

अहमदनगर / प्रतिनिधी : “महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करुन आंदोलने करण्यात आली. राज्यातील भाजप सरकारने या योजनांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. फक्त अनुदान वाटप करण्यापुरतीच ही योजना राबवली. नवीन सरकारकडून घरकुल वंचितांची योजना यशस्वी होणार असून निवार्‍याचा मूलभूत अधिकार मिळणार आहे’’ असे प्रतिपादन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले. 
केंद्र सरकारने मागील चार वर्षापूर्वी जाहीर केलेल्या पं
तप्रधान आवास योजनेचा प्रचार-प्रसार फक्त घरकुल वंचितांची मते मिळवण्यासाठी करण्यात आला असल्याचा आरोप करीत, ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्र राज्य आवास योजनेचे प्रस्ताव पूजन हुतात्मा स्मारकात करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. गवळी बोलत होते.
यावेळी विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका जाधव, संगीता साळुंके, हिराबाई शेकटकर, रुकसाना पठाण, फरिदा शेख, किशोर मुळे, हिराबाई ग्यानप्पा, संगीता साळुंके आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून बेघरांना निवार्‍याचा मूलभूत अधिकार मिळण्याच्या मोठ्या अपेक्षा आहेत. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा समावेश असलेली प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्र राज्य आवास योजना राज्य सरकारने त्वरीत राबवून घरकुल वंचितांना निवार्‍याचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याची मागणी घरकुल वंचितांनी केली आहे.