Breaking News

ढगाळ हवामान पिकांना हानिकारक

अहमदनगर/प्रतिनिधी : शहर व जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून विविध  ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरीही पडत आहे. अशा वातावरणाचा शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमुळे काही दिवसांत रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या थंडीचे दिवस असतानाही हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम पिकांवरही होत आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार झाले आहे. त्यामुळे थंडीदेखील कमी झाली आहे. काही तालुक्यांत पाऊस होत आहे. या काळात तापमान कमी होते. याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
अशा वातावरणात हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली असून कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांभेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान त्रासदायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
 पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. परंतु ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे. या वातावरणाने हरभरा व गहू, तूर, भाजीपाला आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.