Breaking News

अत्याधुनिक नेहरू मार्केटची भरणी करा ; कृती समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट


अहमदनगर / प्रतिनिधी
गेल्या वर्षांपूर्वी पाडण्यात आलेले चितळेरोड़ परिसरातील नेहरू मार्केट अत्याधुनिक पद्धतीने उभारुन गाळेधारक ओटेधारकांची व्यवस्था करावी, या मागणीसाठी चितळेरोड हातगाडी भाजी विक्रेता संघटना आणि नेहरू मार्केट बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा मनपाचे  प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी लवकरात लवकर निविदा काढून नेहरू मार्केट उभारणीचा प्रश् मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला  दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा, नगरसेवक दत्ता कावरे, सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख, शरद मडुर, सोमनाथ चिंतामणी, श्रीदेवी अरोगोंडा, अनीस शेख, राजेंद्र राऊत, अदिनाथ गिरमे, मुन्ना बागवान, भागचंद कोकाटे, रामा केळकर आदींसह नेहरु मार्केटचे गाळेधारक ओटेधारक उपस्थित होते.
२०१० मध्ये अत्यंत चांगल्या अवस्थेत असलेले नेहरु मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. नेहरु मार्केट पाडताना पुन्हा त्या जागेवर भव्य असे भाजी मार्केट शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे त्यावेळी  आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षांमध्ये नेहरु मार्केटच्या उभारणीचे काम सुरू झालेले नाही. नेहरु मार्केटच्या उभारणीसाठी दोन्ही संघटनांच्यावतीने वारंवार आंदोलने करुन निवेदन देऊन शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. २०१३ मध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळेस तत्कालीन पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नसून, नाईलाजास्तव नेहरु मार्केटचे गाळेधारक ओटेधारकांना रस्त्यावर बसावे लागत आहे. यामुळे दिल्लीगेट ते नेता सुभाष चौक दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. नेहरु मार्केट उभारुन भाजी विक्रेत्यांचा प्रश् सोडविल्यास हा रस्ता मोकळा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना नेहरु मार्केटचा संपूर्ण इतिहास सांगत शासन नेहरु मार्केट उभारणीसाठी अनुदान देत नाही तर महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही, ही महत्वपूर्ण बाबदेखील कृती समितीने जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नेहरु मार्केटचे काम खाजगीकरणातून पूर्ण केले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट करीत यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, नेहरू मार्केटच्या उभारणीच्या बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही झाल्यास  चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटना नेहरू मार्केट बचाव कृती समितीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.