Breaking News

राज्यपालांच्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची दिशा स्पष्ट

मुंबई
राज्यपाल भगवतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणातून महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलेल्या वचननाम्यांची आठवण करून दिली. गडकिल्ले संवर्धन, आरोग्य, शिक्षण, किमान कौशल्य विकास ,महिलांचे सक्षमीकरण आणि संरक्षण, बेरोजगारी, नागरी आणि ग्रामीण भागातील रस्ते आणि विशेषतः शेतकर्‍यांचे  ज्वलंत प्रश्‍न यावर राज्यपालांच्या भाषणात ठळकपणे उल्लेख आढळल्याने महाविकास आघाडी सरकारच्या प्रवासाची दिशा स्पष्ट झाली आहे.
महानाट्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारचे गठन झाले. शपथ विधी सोहळा आणि विश्‍वास दर्शक ठरावासाठी बोलविलेल्या विशेष अधिवेशनावर भाजपाने घेतलेला आक्षेप पार करून महाविकास आघाडी सरकारने कारभाराच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली.
विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्वांनाच राज्यपालांच्या अभिभाषणाची उत्सुकता होती.सरकारच्या धोरणांचा या अभिभाषणात समावेश नेहमीच दिसतो. यावेळीही अपेक्षेप्रमाणे राज्य सरकारसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांचा समावेश अभिभाषणात होता.
शिवसेनेने वचननाम्यात सांगीतल्याप्रमाणे शेतकरी कर्जमुक्ती, दहा रूपयात थाळी आणि गडकिल्यांचे संरक्षण संवर्धन करून ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्याचे सुतोवाच या अभिभाषणात होते.याशिवाय एक रूपया क्लिनिक योजना आणि रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर भर देतांना मुख्यमंञी सडक योजनेच्या धर्तीवर विशेष कार्यक्रम हाती घेणे, आठ लाख महिला बचत गटांना उर्जीत करणे, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, माहीती तंञज्ञानातील बेरोजगार पिढीला विकासाच्या प्रवाहात आणणे, सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी विशेष पोर्टलशी जोडून संबंधीत पोलीस ठाण्यांना परस्पर वर्ग करणे अशा विविध मुद्यांना राज्यपालांनी अधोरेखीत केले. धनगर आदिवासी समाजाच्या प्रलंबीत प्रश्‍नांना हे सरकार प्राधान्य देईल असा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात  होता.