Breaking News

तृतीयपंथीयांसाठी देशात प्रथमच स्वतंत्र विद्यापीठ


नवी दिल्ली : तृतीयपंथीयासाठी देशात प्रथमच स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचालीने वेग घेतला आहे. भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण भूमी म्हणून ओळखल्या जात असलेल्या कुशीनगर येथे देशातील प्रथम तृतीयपंथीयासाठी विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. या विद्यापीठात देशातून आणि जगभरातून येणारे तृतीयपंथी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार आहेत. या विद्यापीठासाठी 200 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असून 50 एकर जागा यासाठी लागणार आहे. या विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी तृतीयपंथीयांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. 
कुशीनगर जिल्ह्यातील कसया तालुक्यातील नकटहा गावात अखिल भारतीय किन्नर (हिजडा) शिक्षा सेवा ट्रस्टद्वारे या विद्यापीठाची निर्मिती होणार आहे. यामध्ये प्राथमिकपासून पीचएडीपर्यंतच शिक्षण तृतीयपंथीयांना घेता येणार आहे.  या विद्यापीठासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या कामात तृतीयपंथी समाजाच्या महामंडलेश्‍वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, शबनम मौसी यांच्यासह अनेकांनी मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कृष्ण मोहन मिश्र यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात प्राथमिक विद्यालय सुरू करण्यात येणार असून त्यानंतर विस्तार करत ज्युनियर कॉलेज, महाविद्यालय आणि विद्यापीठाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या विद्यापीठात सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण देखील मिळणार आहे. विद्यापीठाच्या निर्मितीला जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. भारतातील हे एकमेव विद्यापीठ ठरेल जिथे तृतीयपंथी शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने देखील मदतीचे आश्‍वासन दिले असल्याचे डॉ. मिश्र यांनी सांगितले आहे.