Breaking News

महावितरण कार्यालयात रात्रीचा शुकशुकाट तक्रार निवारण केंद्र वाऱ्यावर सोडून कर्मचारी 'गायब'


 संगमनेर/प्रतिनिधी
 संगमनेर तालुक्यासह शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या  (महावितरण) कार्यालयात दिवसा वीज ग्राहकांच्या तक्रारी घेण्यासाठी फोनसुद्धा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची सवयच संगमनेरकरांना झाली आहे. महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध पराक्रमांत आता भर म्हणून कि काय रात्रपाळीला असलेल्या तक्रार निवारण कर्मचारी, लाईनमन, वायरमन यांनी संपूर्ण कार्यालय वाऱ्यावर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे.
  याबाबत अधिक माहिती अशी कि, काल मंगळवार दि.२४ रोजी रात्री बाराच्या सुमारास शहरातील तीनबत्ती चौक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील नागरिकांनी तक्रार देण्यासाठी महावितरण कार्यालयात दूरध्वनी केला असता त्यांना काहीच प्रतिसाद मिळेनासा झाला. शेवटी संगमनेर नगरपरिषदेचे माज़ी उपनगरध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी काही ग्राहकांसह महावितरणचे कार्यालय गाठले. जहागीरदार कार्यालयात गेले असता त्याठिकाणी एकही कर्मचारी, वायरमन किंवा लाईनमन उपस्थित नव्हते. कार्यालयाचे संपूर्ण दरवाजे खिडक्या उघडेच होते. कार्यालयातील संगणक, पंखा, प्रिंटर, दूरध्वनी आणि इतर महत्वाची कागदपत्रे अक्षरशः वाऱ्यावर सोडून कर्मचारी 'गायब' असल्याचे निदर्शनास आले. जहागीरदार आणि त्यांच्यासोबत असलेल्यांनी सुमारे तासभर कर्मचाऱ्यांची त्याठिकाणी वाट बघितली, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. यावेळी जहागीरदार यांनी महावितरण कार्यालयाची परिस्थिती नागरिकांना कळावी यासाठी वाऱ्यावर असलेल्या कार्यालयाचे काही छायाचित्र आणि चलचित्र काढले आहेत. संगमनेर महावितरण कार्यालयातील या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय संगमनेरकरांना अनुभवायला मिळाला. आता अशा कामचुकार महावितरण कर्मचाऱ्यांना वरिष्ठ काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.