Breaking News

मोबाइलवेडी तरुणाई


कोणत्याही सवयीचा अतिरेक झाला की, त्याचे व्यसनात रूपांतर होते आणि हेच व्यसन मग आपले सामाजिक आणि आर्थिक आयुष्यही उद्ध्वस्त करते. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. त्यातूनच सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय. आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलाचा हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.. अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही बातमी. या प्रकरणात तो मुलगा वाचला पण इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे इतक्या टोकाला जाण्याचा विचार चौथीतल्या म्हणजे साधारण नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात येतो कसा? मोबाइलच्या अतिवापराचं हे टोकाचं उदाहरण अर्थात एकमेव उदाहरण नाही. नुकतंच नागपूरमध्ये घडलेलं एक दुर्दैवी प्रकरणं. अगदी ताजं. वेणा तलावात नौकाविहार करायला गेलेल्या तरुणाची बोट फेसबुक लाइव्ह करायच्या नादात उलटली आणि त्यांच्यातल्या आठ जणांना जलसमाधी मिळाली. त्याआधीच आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह इथं पावसाचा आनंद घ्यायला गेलेली एक तरुण मुलगी सेल्फी काढायच्या नादात असताना समुद्रात पडली आणि जीवाला मुकली. मोबाईलचा शोध वापरकर्त्यांच्या सोयीसाठी झाला होता, हेच सध्या आपण विसरतो आहोत. जणू मोबाईल आणि त्यावरील डेटा म्हणजे मानवाच्या मूलभूत गरजेपैकी एक गरज बनली असल्याचे वास्तव समोर येते आहे.
  125 कोटी लोकसंख्या असणा-या भारतात तब्बल 20 कोटी भारतीय मनोविकाराने ग्रस्त असल्याची माहिती एका पाहणीतून यापूर्वीच समोर आली आहे. यामागचे कारण अर्थातच स्मार्टफोनचा अतिवापर असल्याचे सत्यही समोर आले आहे. 2017 ते 2018 दरम्यान एका अभ्यासानुसार, दर सात पैकी एक भारतीय वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक विकारांनी ग्रस्त होता. त्यामध्ये नैराश्यग्रस्त आणि चिंताग्रस्तांची संख्या सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले होते. या मनोविकारांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम यांचा समावेश आहे.
  ‘इंडिया स्टेट लेवल डिसिज बर्डन इनिशिएटिव्ह’ या संस्थेने यासंबंधी एक पाहणी केली होती, तर भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत आहेत, अशी धक्कादायक माहिती नुकतीच सायबर मीडिया रिसर्च आणि एका स्मार्टफोन उत्पादक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींपैकी 75 टक्के किशोरवयीन मुलांकडे स्मार्टफोन आहेत. त्यांपैकी 41 टक्के मुलांकडे शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीपासून स्मार्टफोन आहेत, असे दिसून आले आहे. भारतातील 8 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. 8 शहरांमधील विविध वयोगटांतील सुमारे दोन हजार व्यक्तींनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यापैकी 36 टक्के महिला, तर 64 टक्के पुरुष होते. स्मार्टफोनवरचे अवलंबित्व वाढल्याचे सर्व वयातील वापरकर्त्यांनी मान्य केले आहे. मोबाईल फोन ही एक क्रांती आहे, ज्यामुळे आपली खूप मोठी सोय झाली आहे, पण या सोयीचे गरजेत आणि गरजेचे व्यसनात रूपांतर होऊ न देण्यातच हुशारी आहे. मोबाईलने आपल्याला लांबच्या माणसांशीही जोडले हे खरे आहे, पण आसपासच्या माणसांपासून तोडले हेही नाकारता येणार नाही. या स्मार्टफोनच्या लाटेत वाहवत जायचे की, स्मार्टपणे त्याचा वापर करायचा, हे आपले आपणच ठरवण्याची वेळ आली आहे. मोबाईलचा वाढता वापर लहान मुलांसाठीच नाही, तर सर्वच वयोगटांतील वापरकर्त्यांना घातक ठरणारा आहे.
 मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. असं एकेक करत काळानुरूप मोबाइलमधल्या सुविधा वाढत गेल्या. वय, काम, आवडनिवड, प्राधान्यक्रम यांनुसार मोबाइलमध्ये आकर्षक सुविधा आणल्या गेल्या. या सगळ्यात फक्त मोबाइल आकर्षक वाटून चालणार नव्हते. मोबाइलचं नेटवर्क पुरवणार्‍या कंपन्यांचीही इथे महत्त्वाची भूमिका होती. हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही आकर्षक सुविधांचा सपाटाच लावला. तरुण अशा रीतीने मोबाइलच्या आहारी जाण्यामागे मोबाइल बनवणार्‍या कंपन्या आणि मोबाइलचं नेटवर्क पुरवणार्‍या कंपन्या या दोघांचाही मोठा हातभार आहे.
 नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे मोबाइलच्या वापरालाही दोन बाजू आहेत. प्रवासात काही महत्त्वाची गोष्ट आढळून आली तर त्याचा फोटो काढला जातो. एखादी महिला एकटीने प्रवास करत असतील तर ती ज्या वाहनाने प्रवास करतेय त्याचा नंबर मोबाइलमध्ये नोंदवून तो कुटुंबीयांना ती पाठवू शकते. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा जाताना गुगल मॅप अतिशय उपयुक्त ठरतो. मोबाइलचं रिचार्ज संपलं असेल आणि बॅलन्सची गरज असेल तर विशिष्ट अ‍ॅतप्सवरून बॅलन्स भरला जातो. शिवाय मोबाइल बँकिंगही करता येते. नव्या शहरात आपल्याला घ्यायला येणार्‍या व्यक्तीशी मोबाइलद्वारेच संपर्क साधता येतो. अर्थातच मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया अशांचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो आणि बरेच लोक याचा अशा प्रकारे वापर करतातही. त्यामुळे मोबाईल वाईटच कसा, असे एकतर्फी बोलणे उचित ठरणार नाही. त्याचा अतिरेक झाला की, त्याचे दुष्परिणाम दिसून येतातच आणि हे दुष्परिणाम जीवावर बेतणारेही ठरले आहेत. आपल्यासमोर असणारे तंत्रज्ञान आपण आपला जीव, आयुष्य संपवण्यासाठी वापरायचे की, आपले आयुष्य काही प्रमाणात गतिमान आणि खूप प्रमाणात सुरक्षित करण्यासाठी वापरायचे, याचा विचार प्रत्येकानेच करण्याची वेळ आली आहे