Breaking News

भुरकरवाडी दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी गबर्‍या भोसले लोणंद पोलिसांच्या ताब्यात


लोणंद / वार्ताहर : भुरकरवाडी तरडगांव ता.फलटण येथील पारधी वस्तीवर घडलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी गबर्‍या रमेश भोसले (वय 40) याला अटक करण्यात आलेली आहे.दि.27 डिसेंबरला तो उसाच्या शेतातून फिरत असल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळताच सुमारे बारा तास सापळा रचत त्याला पकडण्यात आलेले आहे.
दि.22 डिसेंबर रोजी भुरकरवाडी तरडगाव येथे फिर्यादी छाया नमन्या पवार यांच्या राहत्या घराच्या जवळ नमन्या पवार व त्याची बहीण आशीबाई भोसले हे गप्पा मारत बसलेले असताना तेथे आरोपी गबर्‍या रमेश भोसले, अरुण पवार,संपूबाई गबर्‍या भोसले,चोच्या राज्या शिंदे, शबनम राज्या शिंदे असे चार चाकी गाडी घेऊन आले.त्यांनी चोरीचा आळ घेण्याच्या कारणावरुन वाद करून नमन्या पवार व आशीबाई भोसले यांना चिडून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपी गबर्‍या रमेश भोसले याने त्याच्या हातातील लाकडी भाल्याने आशीबाई रमेश भोसले हिच्या गळ्यावर व नमन्या हचल  पवार यांच्या पोटात भोकसून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे.अशी माहिती फिर्यादी यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी शोध मोहीम राबविली होती.यांमध्ये सहकारी आरोपी असलेले चोच्या राज्या भोसले,शबनम राज्या भोसले यांना यांमध्ये गबर्‍या  सोबत आलेले साथीदार यांना कधीच ताब्यात घेण्यात आलेले आहे.परंतु मुख्य आरोपी गबर्‍या अजून ताब्यात नव्हता. दिनांक 27 डिसेंबर रोजी गबर्‍या भोसले हा तरडगाव व डोंबाळवाडी परिसरातील उसाच्या शेतात फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्याने पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले पोलीस कर्मचारी यांनी सकाळपासून तरडगाव भागातील उसामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून शोध मोहीम घेत सापळा रचून वस्ती डोंबळवाडी येथे गबर्‍या भोसले येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस  उसामध्ये आरोपी  पकडण्यासाठी दबा धरून बसले.
गबर्‍या भोसले हा तेथील एका उसाच्या शेतातून बाहेर येताच त्यास झडप घालून पकडत असताना तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले.सदर आरोपी अटक करून माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी फलटण यांच्यासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपी गबर्‍या भोसले यांची  दिनांक 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.