Breaking News

देशाला भाजप, आरएसएसचे ग्रहण! वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका


मुंबई : देशात ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागले आहे, त्याचप्रमाणे देशाला सुद्धा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्रहण लागले आहे, त्या ग्रहणाच्या विरोधात आम्ही रत्यावर उतरलो असल्याची बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी कायद्याच्या विरोधात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी धरणे आणि निदर्शनांचे करण्यात आले, यावेळी आंबेडकर बोलत होते.
वंचितच्या धरणे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र अ‍ॅड. आंबेडकर आपल्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर दादर टीटी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी कायद्यासारखे मुद्दे  उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल 40 टक्के हिंदू या कायद्यामुळे बाधित होणार आहेत, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.