Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार


देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी ः
प्रवरा चारी नंबर दोनजवळील महेश कारभारी टाकसाळ यांच्या वस्तीवरील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.
       आंबी, अंमळनेर, केसापूर हा भाग बागायत पट्टा आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठे आहे. या भागात बिबट्याचा संचार असल्याचे वारंवार घडणार्‍या घटनांमुळे स्पष्ट होत आहे.
 या भागात शेळ्या, मेंढ्या, कुत्री, वासरे यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन महिन्यांपूर्वी टाकसाळ यांच्या शेजारीच असलेल्या सुभाष डुकरे यांच्या दुभत्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यामुळे शेळी ठार झाली.
त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेतात जाण्यासही शेतकरी, शेतमजूर घाबरत आहेत. शेळीवरील हल्ल्यानंतर राहुरी येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेळी मालकाला योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
      डुकरे वस्ती, सरई परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी आंबीचे माजी उपसरपंच विजय डुकरे, महेश टाकसाळ, सुभाष डुकरे, राजेंद्र टाकसाळ, महेश साळुंके, गणेश कोळसे, भगवान डुकरे, अरुण डुकरे, सचिन पवार, लखन येवले, अजय शिंदे, प्रकाश टाकसाळ, कुमार येवले, जालिंदर डुकरे, बापूसाहेब टाकसाळ, ललित टाकसाळ, गणेश पवार यांनी केली आहे.