Breaking News

मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले

शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay raut
मुंबई
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलाच वाद झाला. सरत शेवटी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, निवडणुकीच्या काळात झालेल्या घुरघोड्या आता समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी उमेदवार पाडण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. या मुलाखतीत राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शिवसेनेच्या जागा कमी होण्याची कारण काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, शिवसेनेच्या जागा भारतीय जनता पक्षानं पाडल्या. हे जगजाहीर आहे आणि कशाप्रकारे पाडल्या हे रेकॉर्डवर आहे. जेव्हा ठरलं होतं की शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री विभागला जाईल. तेव्हाच हे धोरण ठरलं होतं की, इतकं खच्चीकरण करायचं की शिवसेना मुख्यमंत्रीपद मागायच्या परिस्थितीत राहणार नाही, असं राऊत म्हणाले.
नेमकं हे कुणी केलं या प्रश्‍नावर बोलताना राऊत यांनी सांगितलं की, मी व्यक्तिशः कुणाचंही नाव घेणार नाही. हे धोरणात्मक आहे. उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात शाह म्हणाले होते की, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. पण, यावर उद्धव ठाकरे यांनी यातून पाडापाडी होण्याची शक्यता असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा पर्याय सुचवला. त्यावर शाह यांनी संमती दिल्याचं ठाकरे यांनी सांगितलं होतं. मी कोणतीही गोष्ट मान्य करेल पण, उद्धव ठाकरे खोटं बोलतात हे मी कधीही मान्य करणार नाही. बाळासाहेब ठाकरे खोटं बोलणार नाही. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती खोटं बोलणार नाही. एखादी गोष्ट सोडून देऊ, पण खोटं बोलून घेणार नाही. आमच्यावर पक्षाचा संस्कार आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्‍वास ठेवला. माझ्या नेत्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा आपण संघर्ष केला पाहिजे ही माझी भूमिका आहे, असं राऊत यांनी सांगितलं.