Breaking News

हिंदुत्वाच्या अशुध्द भुमिकेमुळे भाजप सरकार संशयाच्या गर्तेत!नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय  नागरीक नोंदवही हे दोन मुद्दे देशात कळीचे ठरले आहेत.या मुद्यावरून गुद्यांची लढाई सुरू होऊन यादवी पेटते की काय अशी शंका सामिजिक विषयाचे जाणकार व्यक्त करू लागले आहेत.नक्की काय घडतय याबाबत देशाचा मोठा जनसमुदाय संभ्रमात आहे.नागरिकत्व दुरूस्ती कायदा संसदेत वादग्रस्त चर्चेनंतर मंजूर झाल्यानंतर देशात राष्ट्रीय नागरिक नोंदवही सुरू होणार असल्याचे संकेत येऊ लागले.या दोहोंचा संबंध जोडला जाऊन खरे भारतीय असलेले बहुतांश नागरिक बाधित होतील अशी भिती विरोधकांकडून व्यक्त होऊ लागली.हा वाद शिगेला पोहचला असतानाच सन २०२१ ची जनगणना भारतीयांच्या उंबरठ्यावर आहे.या प्रक्रीयेतही आजपर्यंत प्रत्येकाची खाजगी बाब सरकार दरबारी नोंदली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.एकूणच सत्तेवर येण्याआधीपासून संशय असणाऱ्या नरेंद्र मोदी अमित शाहा यांच्या हेतूवर संशय आणखी गडद होऊ लागला आहे.त्याची कारणे आहेत तरी काय? देशाच्या मनावर संशयाची जळमटं येतात तरी कुठून?lead,...
राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या सामाजिक आणि राजकीय हेतूवर संघाच्या जन्मापासूनच संशय व्यक्त केला जातोय.संघाच्या मुशीत तयार झालेल्या जनता पक्ष जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष यांच्यावर देखील भारतीय जनतेने कित्येक वर्ष विश्वास ठेवण्याचे धाडस केले नव्हते.त्याचे  कारण स्पष्ट आहे.संघाला भारत हिंदू राष्ट्र होणे अपेक्षित आहे.ही अपेक्षा पुर्णत्वास नेण्यासाठी मुळ भारतीय असलेले पण प्रवाहाच्या बाहेर असलेला आदिवासी समाज त्यांनी अजेंड्यावर घेतला.संघाच्या नजरेत हिंदू असलेला हा समाज धर्मापासून दुर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे वनवासी कल्याण आश्रमासारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या समाजाचे कल्याण करण्याचा प्रयत्न सुरू केला.वनवासींचे कल्याण करणे संघाचा हेतू कितपत शुध्द होता आणि आहे यावर मतमतांतरे असू शकतात पण हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या संकल्पनेत धर्मापासून दुर जाऊ पहात असलेल्या आदीवासी समाजाला सहभागी करून घेणे हा संघाचा मुख्य हेतू होता आणि आहे यावर कुणाचेही दुमत नाही.एका बाजूला आदीवासींचे मतपरिवर्तनाचे काम युध्द पातळीवर सुरू असताना हिंदु धर्मातील इतर जात पंथातील विशेषतः बहुजन समाजातील पांढरपेशा ,मध्यमवर्गीय घटकाचेही प्रबोधन सुरू ठेवले.या कामात संघाच्या विचारासरणीला पोषक असलेल्या अनेक सनातनी संघटनांनी मोलाचे योगदान दिले आणि आजही देत आहेत.
केवळ सामाजिक पातळीवर काम करून हिंदु राष्ट्राची संकल्पना पुर्णत्वास नेणे कठीणच नाही तर अशक्यप्राय आहे.त्यासाठी देशाच्या कारभाराची सुञे हाती घ्यावे लागतील याची जाणिव संघ नेतृत्वाला अगदी सुरूवातीपासून होती.देशाचा कारभार हाती घ्यायचा असेल तर राजकारण आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या निवडणूका जिंकणे क्रमप्राप्त ठरते.निवडणूकीचे राजकारण जिंकण्यासाठी राजकीय पक्षाचे असणे अपरिहार्य ठरते.या अपरिहार्यतेतून जनता पक्ष,जनसंघ आणि विद्यमान भाजपाचा अवतार भारतीय राजकारणात निर्माण झाला.संघाचे चौकटी बाहेरचे काम या राजकीय पक्षांनी हाती घेतले.माञ संघाला आणि संघाच्या मुशीत तयार झालेल्या राजकीय पक्षांना भारतीय जनतेने अनेक वर्ष स्वीकारले नाही.संघ किंवा संघ प्रणित राजकीय पक्षांना अभिप्रेत असलेले हिंदूत्व भारतीयांना मान्य नाही.भारतात धर्म म्हणून जगणारा मोठा जनसमुदाय असला तरी सहिष्णूता या मुळ धर्मापासून दुर नेणारे तत्वज्ञान या भारतीय हिंदूना मान्य नाही.याच कारणामुळे संघाची राजनिती अनेक वर्ष अपयशी ठरली.माञ आपल्या हेतूवर ठाम असलेल्या संघाने ध्येय गाठण्यासाठी भुमिकेत लवचिकता आणली.नव्या धोरणाप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर प्रभाव असलेल्या प्रादेशिक नेत्यांशी आणि त्यांच्या प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेत सत्तेच्या सोपानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.मजल दरमजल करीत भाजपाने आज देशपातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापीत केले आहे.तरी देखीलअद्यापही देशाचा विश्वास  माञ मिळवता आला नाही.हे गेल्या सहा वर्षाच्या वाटचालीवरून दिसते आहे.त्यांच्या प्रत्येक निर्णयातून देशाला धर्मयुध्दाकडे नेणाऱ्या कटाचा वास जनतेला येतो आहे.सीएए आणि एनआरसी हे मुद्दे या कटाचे सर्वोच्च बिंदू असू शकतात असे बहुतांश जनतेला वाटत आहे.
सीएए किंवा एनआरसीमुळे कुणाचेही नागरीकत्व धोक्यात येणार नाही असा दावा भाजपेयींकडून केला  जात असला तरी मुसलमान समाजाला धोका तर आहेच पण ज्या हिंदुत्वासाठी भाजप घसा कोरडा करीत आहे त्या हिंदू धर्मातील मोठ्या समुदायालाही धोका होऊ शकतो याबाबत रोज नवी माहीती समोर येत आहे.मुळात सीएए लागू करतांना ते तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश करणाऱ्या भाजप सरकारने नेपाळ ,श्रीलंका यासारख्या देशातील हिंदुंना माञ वाऱ्यावर सोडल्याची शोकांतिका मांडली  गेली.अन्य देशातील हिंदू बांधवांचा विचार तर केला नाहीच पण येऊ घातलेल्या  एनआरसीमुळे भारतातील हिदू धर्मातील अनेक छोटेमोठे घटक अडचणीत येण्याची भिती समोर येऊ लागली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आसाम मधील 11 लाख  गडरिया (धनगर) पैकी 90 हजारहून धनगर लोकांना एनआरसीचा फटका बसेल अशी नवी माहीती समोर आल्याने हेतूवरचा संशय आणखी बळावला आहे.
आसाम मधील डोंगर - दरीत रहाणार्‍या 11 लाख गडरिया(धनगर ) समाजापैकी 90 हजारहून अधिक धनगर समाज आपले नागरिकत्व सिद्ध करू न शकल्याने NRC चा मोठा फटका  बसला आहे.  आसाम मधील 3.9cr लोकापैकी 19 लाख लोक नागरिकत्व सिद्ध करू शकले नाहीत त्यात 15 लाख हिंदू  व 4 लाख मुस्लिम आपले नागरिकत्व सिद्ध करू शकले नाहीत.एका रिपोर्ट नुसार 15 लाख हिंदूपैकी 3.5 टक्यांच्या वर भटक्या समाजातील लोक नागरिकत्व सिद्ध करं शकले नाहीत..
गेल्या 5 वर्षांत आसाम मद्ये 5 डिटेक्शन कॅम्प सुरू केले आहेत. .यामध्ये  काही हजार लोकांना डांबण्यात आले आहेत..त्यातही भटके समाजातील लोक आहेत. 
जर देशात एनआरसी लागू झाली तर सर्वात मोठा फटका भटक्या जातींना बसणार आहे. 
त्यामुळे धनगर समाजाच्या लोकांनी हिंदू या शब्दाचा अर्थ काय आहे, तो शब्द कोणी, कोणासाठी, व केव्हा वापरला याचा संदर्भ शोधावा, शूद्र कोण? याचा अभ्यास करावा आणि  एनआरसीविरोधी आंदोलनात सहभागी व्हावे असे नवे आव्हान भाजपा विरोधकांनी उभे केले आहे.आणि म्हणूनच भाजपाचे सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे.त्याचे निर्दोषत्व सिध्द करण्याचे मोठे आव्हान मोदी शाह जोडगोळीवर आहे.