Breaking News

माकडाला खायला घालणे युवकाच्या जीवावर बेतले


पाटण / प्रतिनिधी : कुंभार्ली घाटात माकडांना बिस्कीट खायला घालत असताना  80 फूट खोल दरीत तोल जाऊन  पाटण येथील सुरेश काशिनाथ विभूते या युवकाला आपला जीव गमवावा लागला. अखेर  माकडाला खाऊ घालण्याच्या त्याची आवड जीवावर बेतली त्याच्या  निधनामुळे पाटण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोपाळ माने यांनी त्याबाबत फिर्याद अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
पाटण मधील काशिनाथ विभूते यांचा भाजी व्यवसाय आहे ते कोकणात रामपूर, मार्ग ताम्हाणे येथील आठवडा बाजार करतात बुधवार दि 25 डिसेंबर रोजी रात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुरेश विभूते हा घरातून रामपूरला निघाला भाजी व्यवसायिकच्या गाडीत बसून तो त्याने रामपूरचा आठवडा बाजार केला तर किराणा मालाची वसुली सुद्धा केली त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवार दि 26 डिसेंबर रोजी पाटण मधील गोपाळ ज्ञानेश्‍वर माने, सुशांत विजय लोहार, किशोर प्रकाश पाटील, राजकुमार प्रभाकर देवके हे सर्व पाटणमधील लिफ्ट कारागीर खेर्डी येथे लिप्ट काम करण्यासाठी आले होते
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरेश विभूते त्यांना साइटवर भेटला आणि त्यांना लिफ्ट कामासाठी मदत सुद्धा केली. त्यानंतर काम आटोपून झाल्यानंतर खेर्डी येथील ओमेगा हॉटेलमध्ये त्या पाचजनांनी जेवण केले त्यांनंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते परतीच्या दिशेने निघाले गोपाळ माने यांनी आपल्या ताब्यातील वेगणार गाडी क्रमांक चक-50/3011 घेऊन कराड ते चिपळूण असा प्रवास सुरु झाला सुरेश विभूते याला कुंभार्ली घाटातील माकडांना बिस्किटे खायला घालण्याची आवड असल्यामुळे त्याने खेर्डीत एका पान दुकानातून  दोन बिस्कीट पुडे घेतले. त्यानंतर पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांची  गाडी कुंभार्ली सोनापत्राच्या एका वळणावर थांबली.
त्यावेळी सुरेश विभूते  गाडीतून खाली उतरला आणि घाटातील कठड्यावर बसलेल्या माकडांना बिस्कीट खायला देण्यासाठी निघून गेला. त्यावेळी एक पाय कठड्यावर व एक पाय खाली हवेत सोडून तो माकडांना बिस्कीट खाउ घालत असताना त्याचा तोल गेला आणि घाटातील 80 फूट खोल दरीत कोसळला. त्याला कोसळताना पाहून सहका-याची बोबडीच वळली आणि ते मदतीसाठी हाका मारू लागले. घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलिसांना मिळताच पोलिस हवालदार कोळेकर, कॉन्स्टेबल शिंदे, हवालदार गव्हाणे,पोलिस नाईक ओतारी यांनी  घटनास्थळी धाव घेतली तर पोफळीतील सामाजिक कार्यकर्ते अनंत साळवी, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी ग्रुप मधील युवकांनी घटनास्थळी धाव घेवून बचाव कार्यासाठी प्रयत्न सुरू झाले.