Breaking News

टँकरच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार

अहमदनगर/प्रतिनिधी :  शहरातून सावेडीकडे जाणार्‍या दुचाकीस्वाराला डीएसपी चौकाकडून येत असलेल्या टँकरची जोराची धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वारवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कमलेश  उर्फ अभिजित अनिल पटवा असे या अपघातात मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.30) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
येथील भूतकरवाडी परिसरातील दीप कॉम्प्लेक्समध्ये राहत असलेला हा तरुण मार्केट यार्ड येथील अरिहंत सेल्स मशिनरी अ‍ॅण्ड हार्डवेअर स्पेअर पार्टस् या दुकानाचा मालक होता. सावेडीकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघात होताच पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली. अपघात एवढा भयानक होता, की टँकरचे चाक मयत तरुणाच्या पूर्णपणे अंगावरून गेले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शहरातून जड वाहतुकीला बंदी असतानाही वाहने शहरातून जात आहेत. त्यात पत्रकार चौकात नेहमीच मोठी गर्दी असते. गाडीच्या क्रमांकावरून वाहनचालकाचा शोध घेतला असता दुचाकीचालकाच्या मालकाचे नाव कमलेश अनिल पटवा असल्याचे तोफखाना पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी टँकरचालक संजय सखाराम जपकर (रा. नेप्ती) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघाताची क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. यामध्ये मयत तरुण हा मोबाईलवर बोलत चालल्याचे दिसत आहे. मोबाईवर बोलण्याच्या नादात त्याला टँकरच्या वेगाचा अंदाज आला नाही आणि हवेने दुचाकी कोलमडून तरुण टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडला. टँकरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, पत्रकार चौकात दुपारच्या वेळी झालेल्या या अपघातामध्ये घटनास्थळी उपस्थित असलेली एक तरुणी भयंकर घाबरलेली होती आणि हे चित्रण सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बराच वेळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.
अवजड वाहतुकीचा
विषय पुन्हा ऐरणीवर!
शहरात सकाळी अकरा ते पाच अवजड वाहतुकीला बंदी आहे. मात्र हा टँकर डीएसपी चौकाकडून पत्रकार चौकामार्गे शहरात आलाच कसा, तेथील ’फिक्स पॉईंट’वर नेमणुकीला पोलीस कर्मचारी काय करत होते, हा टँकर शहरात आल्याचे या पोलिसांच्या ध्यानात कसे आले नाही या सर्व प्रश्‍नचिन्हांतून शहर वाहतूक पोलिसांची निष्काळजी समोर येत असून या अपघाताच्या निमित्ताने अवजड वाहतुकीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
नियमांचा अभाव
त्यात मोबाईलचा प्रभाव!
शहरात वाहतुकीच्या नियमांची केव्हाचीच ’ऐसी की तैसी’ झालेली आहे. दुचाकीवर कोण ट्रिपल सीट जातोय, कोण सिग्नल मोडतोय, कोण बिनधास्त दुचाकीवरून मोबाईलवर बोलत भरधाव वेगात जातोय. मध्यंतरी शहर वाहतूक शाखेने विविध फ्लेक्सच्या माध्यमातून चौकाचौकांत जनतेचे  चांगल्या प्रकारे प्रबोधन केले होते. मात्र आता तसे प्रबोधनही नाही, वाहतूक सुरक्षा सप्ताहदेखील कुठे हरवला, हे कळत नाही. या शहरात वाहतुकीच्या नियमांचा आधीच अभाव आहे आणि त्यात मोबाईलचा भलताच प्रभाव असल्यामुळेच अशा अपघाती घटना घडत आहेत.