Breaking News

अनधिकृत स्फोटकाचे गोडाऊन पाडावे

अहमदनगर/प्रतिनिधी : इक्सप्लोजिव्हच्या नियमांचे उल्लंघन करुन अरणगाव (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या स्फोटकांच्या गोडाऊनचा परवाना रद्द करुन हे अनाधिकृत बांधकाम त्वरीत पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना पोटे यांनी नाशिक महसूल विभाग आयुक्तांकडे केली. नियमाची पायमल्ली करुन दुमजली बांधण्यात आलेले गोडाऊनसाठी फायर ऑडिट करण्यात आले नसून, तसेच नगररचना विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी आलेली नसल्याचे पोटे यांनी महसूल आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव मधील गट नंबर 368/1 आणि 368/2 या गटांमध्ये फटाक्यांचे दुमजली गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. ते गोडाऊन इक्सप्लोजिव्हच्या नियमानुसार बांधण्यात आलेले नाही. त्याचे फायर ऑडिट देखील करण्यात आलेले नसून, ते बांधताना नगररचना विभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागून देखील कारवाई होत नसल्याने रंजना पोटे यांनी नाशिक महसूल विभाग आयुक्तांकडे तक्रार केली आहे.