Breaking News

गहू, हरभर्‍यावर रोगाचा प्रादुर्भाव


टिळकनगर/ प्रतिनिधी ः
पावसाळ्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढल्याने श्रीरामपूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. परंतु आठ- दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अल्प प्रमाणात पाऊसही पडला. यामुळे गहू, हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकरी औषधाची फवारणी करत आहेत. एकलहरे, उक्कलगाव येथील शेतकर्‍यांची पिके वाचवण्याची धडपड चालली आहे.
  गेल्या वर्षी नगर जिल्ह्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने पिकांची लागवड केली. पिके फोफावत असतानाच जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाची छाया पसरली. अगदीच अल्प असलेली थंडीही यामुळे गायब झाली. त्याचा परिणाम म्हणून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. श्रीरामपूरमध्ये अगदी सूर्यदर्शनही होईनासे झाले आहे.
या प्रतिकूल वातावरणामुळे एकलहरे, उक्कलगाव येथील शेतकरी चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे पण रब्बीतील गहू आणि हरभर्‍याच्या वाढीसाठी पूरक वातावरण नाही. त्यातच आता ऐन हिवाळ्यात ढग वातावरण तयार झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गहू, हरभर्‍याच्या वाढीसाठी आकाश निरभ्र असणे आणि वातावरणात गारठा असणे गरजेचे आहे. परंतु नेमके त्याउलट वातावरण तयार झाले आहे. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही ठिकाणी गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे.
गव्हाची पेरणी होऊन तीन आठवडे ते एक महिना होत आला आहे. गव्हाची वाढदेखील बर्‍यापैकी झाली. परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते. काही काळ गारठा निर्माण होतो, परंतु बराच काळ दमट वातावरण निर्माण होते. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या आहेत. निर्माण झालेले हे वातावरण गहू आणि हरभर्‍यासाठी मारक ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण
असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना
बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळी
बरोबरच इतरही रोगांचा प्रादूर्भाव दिसू लागला आहे. यामुळे
शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी महागडी औषधे घेऊन पिकावर फवारणी करत आहेत.
- सिराज आलम, शेतकरी, एकलहरे.