Breaking News

संगमनेरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली
 संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (गुरुवार) 'समर्थन रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते. आज सायंकाळी चारच्या सुमारास शहरातील लाल बहादूर शास्त्री चौकातून सुरुवात झालेल्या रॅलीचा समारोप नवीन नगर रस्त्यावरील प्रांत कार्यालयाबाहेर घेण्यात आलेल्या जाहीर सभेतून करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, पतित पावन संघटना यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. समर्थन रॅलीत महिला आणि युवतींचा देखील समावेश लक्षणीय होता.
 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत तरुणांनी मानवी साखळी तयार करून सुमारे ३५० फूट लांबीचा तिरंगा आपल्या हातात घेऊन रॅलीत सहभाग घेतला. यावेळी शहरातील अनेक व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील आणि व्यावसायिकांनी रॅलीत सामील होऊन या कायद्याला आपला पाठिंबा दर्शविला. नवीन नगर रस्ता याठिकाणी आयोजित सभेत अनेक मान्यवरांनी नवीन कायद्याविषयी आपले मत मांडले. त्याचबरोबर नागरिकांच्या मनामध्ये या कायद्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न वक्त्यांनी आपल्या भाषणातून केला.
 एकीकडे अनेक राजकीय पक्ष समुदायांकडून या कायद्याला विरोध केला जात असताना आता दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनासाठीही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्याचे चित्र देशभरात आहे. त्याचाच एकभाग म्हणून संगमनेरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठीसमर्थन रॅलीचे आयोजन करून केंद्राने संमत केलेल्या कायद्याला समर्थन दर्शविले जात आहे.