Breaking News

कुर्ला, बोरिवली, वसईत रूळमृत्यू घटले

मुंबई 
 रूळ ओलांडताना होणार्‍या अपघातांवर नियंत्रण राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अंशत: यशस्वी ठरत आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात चर्चगेटसह कुर्ला, बोरिवली, वसई रोड या रेल्वे स्थानकांतील अपघाती मृत्यूंत कमालीची घट झाली आहे. तथापि, मुंबई लोकलवर ‘शून्य मृत्यू’ हे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला अद्याप बराच पल्ला गाठावा लागणार आहे.
रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, फटका पद्धतीने होणार्‍या चोर्‍या अशा अन्य कारणांमुळे रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होतो. रेल्वे अपघातांपैकी सुमारे 70 टक्के अपमृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. रुळांवरील अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची माहिती दिव्यांग प्रवासी नितीन गायकवाड यांनी रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडे मागितली होती.
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मृत्यूचे स्थानक अशी ओळख बनत असलेल्या बोरिवली, कुर्ला आणि वसई रोड स्थानकांतील अपघाती मृत्यूमध्ये 60 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते. बोरिवलीत 2010 मध्ये रेल्वे अपघातात एकूण 342 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 2019 मध्ये (सप्टेंबर अखेर) 165 प्रवाशांना अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागले. कल्याण स्थानकात 2010 ला 415 आणि 2019 मध्ये (सप्टेंबर अखेर) 243 प्रवाशांचा मृत्यू झाला. पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकातील अपमृत्यूत सर्वाधिक, 70 टक्क्यांनी घट झाली आहे.
उपाय यशस्वी ठरताहेत : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई लोकलवरील अपघाती मृत्यूबाबत चिंता व्यक्त करत मध्य-पश्‍चिम रेल्वेला अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय करण्याचे सांगितले. यात रुळांलगत भिंत उभारणे, प्रवाशांमध्ये जनजागृती, कलाकारांकडून जागरुकता मोहीम, अपघातांच्या दुष्परिणामांचे व्हिडीओ बनवून फेसबुक-ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहचवणे यांचा समावेश आहे.
‘शून्य मृत्यू’च्या दिशेने वाटचाल : ‘शून्य अपमृत्यू’ हा उपक्रम मुंबई रेल्वेवर राबवण्यासाठी मुंबई लोकलचे संपूर्ण वातानुकूलन करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. तसेच मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प- 3 मध्ये देखील रूळ ओलांडणीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली. मात्र मुंबई रेल्वेवरील सध्याची स्थिती पाहता शून्य मृत्यू हे ध्येय गाठण्यासाठी या उपाययोजनांमध्ये वाढ आणि सातत्य राखणे अपेक्षित आहे. सध्या शून्य मृत्यू उद्दिष्ट गाठण्यासाठी सध्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.