Breaking News

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सीनाचे पाणी बंधाऱ्यात


  
 कर्जत: प्रतिनिधी
  तालुक्यातील सीना धरणाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे २१ गावांच्या पाणी नियोजनाची बैठक प्रथमच आमदार रोहित पवार यांनी त्याच धरणाच्या विश्रामग्रुहात घेतली होती. या बैठकीत सीना धरणाच्या संबंधित असलेले अधिकारी तेथील ग्रामस्थांशी आमदार पवार यांनी संवाद साधत पाणी नियोजनाबाबत चर्चा केली. त्यानुसार तालुक्यातील बेलगाव कानडी बंधारा, घुमरी पिंप्री बंधारा या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.
 सुमारे तीन वर्षांपासून या लाभ क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी तालुक्यातील घुमरी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानंतर आमदार पवार यांनी या मागणीचा पाठपुरावा करत पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याबाबत आदेश दिले होते. तालुक्यातील बेलगाव कानडी बंधारा, घुमरी पिंप्री बंधारा या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील घुमरी, तर आष्टी तालुक्यातील पिंप्री गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. या आवर्तनाने सुमारे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जलपूजन करून आनंदोत्सव साजरा करत ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

 
उर्वरित बंधाऱ्यात पाणी
 सीना धरण पाणी नियोजनाबाबत आमदार पवार यांनी यापूर्वी बैठक घेतली होती. त्यानंतर दहाच दिवसात सीनाच्या काही बंधाऱ्यात पाणी आले होते. उर्वरित बंधाऱ्यातही पाणी सोडले जाणार असल्याचा शब्द आमदार पवार यांनी दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा सीनाचे बंधाऱ्यात पाणी आले. त्यामुळे दिलेला शब्द पुन्हा एकदा पाळला असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.