Breaking News

जिल्हा परिषद प्रवेशद्वारात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा ठिय्या

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर 2019 या तीन महिन्यांचे वेतन अद्यापि मिळाले नसल्याने त्यांनी भीक मागो आंदोलन केले असून हा प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.  
 येथील बुरुडगाव रोडवरील भाकपच्या कार्यालयापासून संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. या आंदोलनात मारुती सावंत, सुरेश को
काटे, राहुल पटेल, संजय डमाळ, सुनील शिंदे, शरद खोडदे, उत्तम कराडे, अरुण राऊत, किरण फटांगरे, भाऊसाहेब गिरवले, ब्राह्मणे, रवींद्र पवळ, दादा कापसे, दिलीप बोरुडे, दादा साळवे, रोहिदास पेटारे, संपत चाबुकस्वार, गणेश शिंदे, संतोष आल्हाट, अनिल शिंदे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर वळवला. यावेळी कर्मचार्‍यांनी झोळी पुढे करुन भीक जमा केली तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली. 
या प्रश्‍नाबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.7 डिसेंबरला झालेल्या बैठकीत मागील तीन महिन्यांचे वेतन अदा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर संघटनेने पाठपुरावा करुन वेतनासाठी स्मरणपत्र देखील दिले. मात्र त्याचीही दखल घेतली नसल्याने 15 दिवसानंतर आज ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी भीक मांगो आंदोलन करीत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. विभाग) निखीलकुमार ओसवाल यांना देऊन चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची व्यवस्थित माहिती व कागदपत्र संकलित न केल्याने बरेच कर्मचारी वेतनापासून वंचित आहे तर ऑनलाईन बिघाडाचा फटका देखील त्यांना बसत आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नसल्याची बाब अ‍ॅड. टोकेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी बीडीओ यांना पत्र काढण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.