Breaking News

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली संगमनेर/प्रतिनिधी
पाकिस्तान, बांग्लादेश व अफगानिस्तानसारख्या मुस्लिमबहूल देशांमधून धार्मिक प्रताडणेच्या कारणास्तव भारतात शरणार्थी म्हणून राहणार्‍या अल्पसंख्याकांना सन्मान मिळवून देणार्‍या नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी गुरुवार दि.२६  रोजी संगमनेरात ‘समर्थन रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. विविध राष्ट्रप्रेमी संघटनांनी आयोजित केलेल्या या रॅलीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे सर्वसामान्यांच्या मनातील अज्ञान दूर करण्यासाठी अभ्यासपूर्ण विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. या समर्थन रॅलीला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 एकीकडे काही राजकीय पक्ष व समुदायांकडून या कायद्याला विरोध केला जात असतांना आता दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनासाठीही विविध समुदाय व संघटना सरसावल्या आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी ‘समर्थन रॅली’ काढण्यात येवून केंद्राने संमत केलेल्या कायद्याला पाठीबा दर्शविला जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर संगमनेरातील विविध राष्ट्रप्रेमी संघटनांनी कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोमवारी चंद्रशेखर चौक मारुती मंदिर याठिकाणी बैठकही घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेकडो सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी समर्थन रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवार दि.२६ रोजी दुपारी ४ वाजता नगरपालिकेसमोरील लाल बहाद्दूर शास्त्री चौकातून समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा समारोप नवीन नगर रस्त्यावर होवून नव्याने मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विविध पैलू उलगडणार्‍या व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. संगमनेरातील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.