Breaking News

प्रशासकीय अधिकारी सुटीवर मात्र जिल्हाधिकारी ‘बिझी’!बाळासाहेब शेटे
अहमदनगर : महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी सुटीचा आनंद घेत असतात. परंतु जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आज (दि.28) हजर झाले आणि ढीगभर फायलींवर त्यांनी सह्या करत कामाचा ‘निपटारा’ केला.
 जिल्हा प्रशासनाचा प्रमुख ‘अधिकारी पण काम म्हणजे काम’ या विचारप्रणालींनुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी  कामालाच प्रथम प्राधान्य दिले. जिल्हा प्रशासनाच्या या प्रमुखाचा अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी आदर्श घेतल्यास जिल्हा प्रशासनाला खर्‍या अर्थाने ‘गतिमान’ होण्याचे संकेत निश्‍चितच मिळतील.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्याला अलीकडेच एक आदर्श पॅटर्न दिला आहे. ‘कि ऑस्क मशीन’च्या सहाय्याने सामान्य माणूस अगदी कमी वेळेत ऑनलाईन सातबारा उतारा आणि अन्य शासकीय कागदपत्र सहजासहजी काढू शकतो, हे या पॅटर्नचे यश आहे. जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर काम करत असतांना त्या कामाविषयीची आत्मीयता, जबाबदारीचे भान, आणि विशिष्ट वेळेत ते काम पूर्ण करण्याची प्रामाणिक धडपड हे सद्गुण पाठीशी असले की आदर्श कामकाजाची प्रणाली तयार होते, हे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नागरवासियांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा किंवा कोणते काम किती वेळेत करायचे, जिल्हाधिकारी कार्यालयात भेटायला आलेल्या अभ्यागतांना किती वेळ द्यायचा, किंवा त्या अभ्यागताला त्याच्या कामाबाबत  ‘संतुष्ट’ करून अवघ्या काही मिनिटांतच बाहेर पाठवून दुसर्‍या अभ्यागताला कधी  केबिनमध्ये घ्यायचे, याची एक ‘स्टॅटेजी’ जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ठरवून घेतली आहे. भेटायला येणारा मग तो कोणीही असो, त्या कोणाचाच मुलाहिजा न ठेवता सर्वांना ठराविक वेळेत यशस्वीरीत्या ‘मार्गी’ लावण्याची हातोटी असलेल्या ‘वक्तशीर कलेक्टर’चे दर्शन या निमित्ताने अनेकांना होत आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांची कारकिर्द नगर जिल्ह्याला योग्य आणि आशादायी वळणाकडे घेऊन जात असल्याचा प्रत्यय सर्वांनाच येत आहे. महापालिकेचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच असल्याने शहरवासियांना तर तो प्रत्यय सातत्यानेच येत असतो. मात्र शिस्त आणि कामाविषयी तळमळ असलेल्या जिल्हाप्रशासनाचा परिचय जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक आमदारांना आला आहे. मात्र आता त्यांच्या तडाखेबाज आणि शिस्तप्रिय कामकाजाच्या प्रणालीतून भुईकोट किल्ल्याचे रखडलेले सुशोभिकरण आणि नगरकरांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे पूर्णत्व हे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या कार्यप्रणालीमध्ये ‘माईल स्टोन’ अर्थात मैलाचा दगड ठरोत, हीच भोळ्या-भाबड्या नगरकरांची रास्त अपेक्षा आहे.