Breaking News

'मिनी मंत्रालया'च्या कारभारी निवडीसाठी अवघे रंगले चर्चेचे गुऱ्हाळ!


अहमदनगर / प्रतिनिधी
'मिनी मंत्रालय' अर्थात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीला अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाव्य अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे गुलदस्त्यात ठेवणेच पसंत केले. भाजप आणि महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनी यासंदर्भात सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्वतंत्र ठिकाणी घेतलेल्या बैठकांत केवळ चर्चाच केली. मात्र चर्चेच्या या प्रदीर्घ गुऱ्हाळानंतर जिल्हा परिषदेच्या संभाव्य अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे गुलदस्त्यातच ठेवली.
दरम्यान, काहींनी वावड्या उठविल्या, की शालिनी विखे यावेळी थांबणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचीही अनेकांनी तर्कवितर्क केले. मात्र ऐनवेळी विखे यांनी निर्णय बदलला तर पुन्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेचे चित्र बदलणार. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीने जसा जोर लावला, तसा हा जोर कमी करण्यासाठी भाजपनेही मोर्चेबांधणी केली आहे. यासंदर्भात भाजपने . राधाकृष्ण विखे आणि . प्रा. राम शिंदे यांच्यावरच निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, संख्याबळाचा भाजपने तयारी केल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणे जवळपास अशक्य आहे.
दरम्यान, राज्यात यशस्वी झालेला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी असा महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत जवळपास निश्चित झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपही ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी अध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार कोण, याबाबत अद्यापपर्यंत तरी निर्णय झालेला नाही. शालिनी विखे यांची भूमिका स्पष्ट झाली नसल्याने यासंदर्भात सध्या तरी तर्क वितर्क सुरु आहेत. दरम्यान, उमेदवार जाहीर कारण्याऐवजी अर्ज भरतांना नाव उघडकीस करण्याचे धोरण भाजप आणि महाविकास आघाडीने राबविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची नावे आज अर्थात दि.३१ रोजीच स्पष्ट होतील.