Breaking News

कॅन्टोन्मेंट बोर्डाची रुग्णवाहिका धूळखात!

अहमदनगर/ प्रतिनिधी : लष्कराच्या अखत्यारित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची रुग्णवाहिका गेल्या सात महिन्यांपासून धूळखात पडली आहे. या रुग्णवाहिकेवर असलेला पूर्वीचा चालक सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन चालकच मिळाला नसल्याने रुग्णवाहिका बंद ठेवण्याची नामुष्की कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनावर आली आहे. दरम्यान, रुग्णवाहिकेची अत्यावश्यक सेवा बंद असल्याने भिंगारमधील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी थांबायचे नाव घ्यायला तयार नाहीत. या रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि झे
रॉक्स मशीन बंद असल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमंथन’ने या समस्येकडे  सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने झेरॉक्स मशीन तत्काळ सुरु केले. मात्र रुग्णवाहिका अद्याप धूळ खात उभी आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये येत असलेला रुग्णवाहिकेचा प्रश्‍न विद्यमान सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला का दिसत नाही? किंवा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यवाही का केली जात नाही?, या प्रश्‍नांची उत्तरे आजमितीला कोणाकडेच नाहीत, हे वास्तव आहे.
लोकनियुक्त सदस्य
करतात तरी काय?
देशात वाढणार्‍या लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्रक्रियांवर केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाच गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्या का बंद आहेत, काय अडचणी आहेत, ऑपरेशन थिएटर का बंद आहे, त्यामध्ये कोणकोणती साधने आणि मशिनरी नाहीत, या रुग्णालयात प्रसूती का होत नाही, अशा अनेक समस्या गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून जशाच्या तशाच ’आ’ वासून असताना जनतेने मोठ्या विश्‍वासाने निवडून दिलेले लोकनियुक्त सदस्य करतात तरी काय, असा सर्वांनाच अंतर्मुख करणारा सवाल भिंगारवासियांमधून उपस्थित होत आहे.