Breaking News

निपाणी वडगाव रेल्वे स्टेशनची दुरवस्था!


अशोकनगर / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्वाचे असलेल्या निपाणी वडगाव येथील रेल्वेस्टेशनची  इमारत रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे कामात पाडून टाकण्यात आली आहे. येथे  तिकीट देणे बंद करून मनमाड-दौडपुणे या  पॅसेंजर गाड्याही थांबत नाहीत. परिणामी अशोकनगर, कारेगाव, मातापूर, खोकर, वळदगाव येथील विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर पॅसेंजर गाड्या पूर्ववत थांबवा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर स्टेशनचे प्रबंधक एल. पी. सिंग यांच्यामार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देण्यात देण्यात आले. याप्रसंगी रेल्वे व्यवस्थापकांबरोबर सविस्तर चर्चा होऊन त्यांनी संबंधित अडचणी लवकरात लवकर सोडविण्याचे प्रवाशांना आश्वासन दिले.
निपाणी वडगाव येथे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामापूर्वी पॅसेंजर  गाड्या नियमित थांबत होत्या. तिकीटविक्रीचीही व्यवस्था केलेली होती. परंतु दुहेरीकरणाच्या कामानंतर येथील सुविधा पूर्ववत करणे आवश्यक असतांनादेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाली आहे. त्यामुळे संबधित गावच्या नागरिकांनी रेल्वेस्टेशनची नवीन इमारत बांधणे, मनमाड-दौडपुणे या पसेंजर गाड्या पूर्ववत सुरु करून त्यांना थांबा देणे, रात्रीच्या प्रवाशांकरिता लाइटची व्यवस्था करणे आणि रेल्वेस्टेशनच्या नावाचे काढून टाकलेले फलक पुन्हा बसविणे या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी विस्तार अधिकारी अशोक बोरुडे, भगतसिंग ब्रिगेडचे अध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख, प्रशांतराजे शिंदे, संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनशेठ लोळगे, जॉन भालेराव, कालिदास हांडे, रंजन साळवी, संजय राऊत, दादासाहेब कापसे, रमेश वाघमारे, अजित राऊत, चंद्रकांत येवले, भाऊसाहेब कुऱ्हे  आदी प्रवाशांसह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.