Breaking News

५०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शहराला कधी येणार 'अच्छे दिन'? महापालिकेचे उत्पन्न स्रोत कधी वाढणार? एमआयडीसीचा विस्तार केव्हा होणार?

अहमदनगर /प्रतिनिधी
'चांदबीबी जरी आली तरी रस्ता चुकणार नाही', असे उपरोधिकपणे ज्या शहराबद्दल आजपर्यंत बोलले जात आहे, त्या काना, मात्र, वेलांटी, उकार नसलेल्या अहमदनगर शहराला पाचशे वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र या शहराची दैना काही केल्या हटायचे नाव घेत नाही. आजही या शहरात मोकाट जनावरांचे कळप हिंडत आहेत. रस्त्यावर ठाण मांडून बसत रहदारीला अडथळा करत आहेत. दरम्यान, देशात दुसऱ्या पंचवार्षिकलाही ' अच्छे दिन' आले, मात्र पाचशे वर्षांपूर्वी वसलेल्या या शहराला 'अच्छे दिन' कधी येणार, ज्या यंत्रणेच्या भरोशावर या शहराचा गाडा हाकला जातो, त्या महापालिकेचे उत्पनाचे स्रोत कधी वाढणार आहे, या शहराला महसूल देणाऱ्या उद्योगविश्वासाचा अर्थात एम आय डी सी चा विस्तार केव्हा होणार, असे अनेक प्रकारचे सवाल या शहराच्या नागरिकांमधून उपस्थित केले जात  आहेत.
मुस्लिम राजवटीत अहमदशहाने या शहराची स्थापना केली. या शहराच्या स्थापनेला पाचशे वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र या प्रदीर्घ कालखंडांनंतरदेखील या शहरात फारसे परिवर्तन झाले नाही. उंच इमारती तेवढ्या झाल्या, अनेक नागरी वसाहती स्थापन करण्यात आल्या, ज्यातून बिल्डर लॉबीचे खिसे गरम झाले.  मात्र या इमारती आणि नागरी वसाहतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांना सेवासुविधा देणार महापालिकेच्या नाकी नऊ येत आहेत.
या शहराच्या रस्त्यांची दुरवस्था काही केल्या नीट होत नाही. 'रस्त्यावर खड्डे की खड्यांत रस्ता' या अनेक दिवसांपासूनच्या प्रश्नाचे उत्तर येथील नागरिकांना मिळू शकले नाही. आजही या शहरात गटारी, नाल्यांचे प्रश्न आ वासून आहेत. पाण्याच्या पाईपलाईनची दुरावस्था आणि मैलामिश्रित हे मुद्दे आजही येथील नागरिकांच्या जीवनमरणाचे विषय होऊन बसले आहेत. एका अर्थाने पाचशे वर्षांच्या गतकाळात या शहराने विकासाचे तोंडदेखील पाहिलेले नाही. त्यामुळे या शहराला निदान या जन्मात तरी 'अच्छे दिन' येणार का, अशी विचारणा येथील नागरिक करत आहेत.