Breaking News

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासात सातत्य गरजेचे


पारनेर/ प्रतिनिधी ः
स्पर्धा परीक्षा, नेट- सेट परीक्षा, संशोधन यामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे, असे  प्रतिपादन डॉ. एस. जी. पुराणे यांनी केले.
    पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये गणित शास्रज्ञ डॉ. रामानुजन जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे होते.
   डॉ.  पुराणे म्हणाले, डॉ. रामानुजन यांनी आपले संपूर्ण आयुष्य गणित विषयासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन केले पाहिजे.
पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गवळी म्हणाले, डॉ. रामानुजन यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन गणित विषयात भरीव कार्य केले. या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनीही नावलैकिक मिळवावा. उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे म्हणाले, विविध उपक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात संशोधनवृत्ती वाढीस लागावी या हेतूने महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. ठुबे यांनी डॉ. रामानुजन यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर वाघ, डॉ. राहुल डिग्गीकर, एस. जी. तांबोळी, एम. टी. खामकर, एस. बी. काळोखे, डी. एस. कावरे, एस. डी. वाबळे, वाय. जी. आंधळे, ए. बी. धस, जे. एस. भोसले, विजय झावरे, अशोक वरकटे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक राणी सोनवणे यांनी केले. एम. टी. खामकर यांनी आभार मानले.