Breaking News

चोरीचे सोयाबीन विकत घेणारा आरोपी गजाआड कधी? व्यापारी नाशिकच्या वरिष्ठांना भेटणार?


अहमदनगर / प्रतिनिधी
येथील एका व्यापाऱ्याचे दहा लाख रुपये किंमतीचे २३ टन सोयाबीन धुळ्याला पोहोच करण्याऐवजी मध्यप्रदेशमधील सेंधवा येथील मनोजकुमार या ट्रकचालकाने एका व्यापाऱ्याला विकले. दि. २० जुलै रोजी संबंधित व्यापाऱ्याने यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या पोलीस ठाण्याच्या डिटेक्टिव्ह ब्रँचने {डी बी} या व्यापाऱ्याच्या खर्चाने मध्यप्रदेशच्या सेंधवा येथे जाऊन १४ टन सोयाबीन जप्त केले. मात्र उर्वरित नऊ टन सोयाबीन विकत घेणारा आरोपी असलेला व्यापारी अद्याप मोकाटच आहे. या आरोपीच्या मुसक्या केंव्हा आवळणार, असा सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित होत आहे. यासंदर्भात अहमदनगरचे व्यापारी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घालणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले. मात्र एकाला आश्चर्यकारकरित्या या गुन्ह्यातून वगळले. एकाला जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान, आजमितीला या गुन्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी १४ टन सोयाबीन जप्त केले. या कारवाईत डी बी पथकाच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित नऊ टन सोयाबीन विकत घेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळायच्या अद्याप बाकी आहे. दरम्यान, चोरीचे सोयाबीन विकत घेणाऱ्या आरोपीशी पोलिसांनी आर्थिक 'तडजोड' केल्याची येथील व्यापारी वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी येथील व्यापारी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक यांची लवकरच भेट घेणार आहेत.
चौकट
'त्या' 'साहेबा'ला लागले 'कोतवाली'चे पाणी!
या गुन्ह्याचा तपास ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे आहे, ते यापूर्वी राहुरीला होते. राहुरीला असताना ते शांत, सरळ आणि कर्तव्याशी एकनिष्ठ होते. मात्र कोतवालीचा पदभार घेताच या अधिकाऱ्याने रंग दाखवायला सुरुवात केली. या अधिकाऱ्याने चोरीचे सोयाबीन विकत घेणाऱ्या आरोपीशी संगनमत करून मोठी 'तडजोड' केल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. तपासाच्या नावाखाली व्यापाऱ्याच्याच खर्चाने मध्यप्रदेशची 'सफर' करणाऱ्या आणि तेथे जाऊन त्या आरोपीशी 'तडजोड' करणाऱ्या या अधिकाऱ्याविषयी अहमदनगरच्या व्यापारी वर्तुळात तीव्र नाराजी पसरली असून या अधिकाऱ्याला इतक्या झटपट 'कोतवाली'चे पाणी लागल्याची शहरात मोठी चर्चा ऐकायला मिळत आहे.
चौकट
व्यापाऱ्याचे साडेचार लाख पाण्यात!
या गुन्ह्यात जप्त केलेल्या सोयाबीनशिवाय उर्वरित तब्बल लाख रुपयांची सोयाबीन जप्त करण अद्याप बाकी आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी कोतवालीच्या  पोलिसांना मध्यप्रदेशच्या सेंधवा येथे घेऊन जाणे, तेथे दोन तीन दिवस या पोलिसांच्या राहण्याची, जेवणाची सोय लावण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याचे तब्बल लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत.
/