Breaking News

सारथी बंद केल्यास मंत्र्यांना घेराव


अकोले/ प्रतिनिधी ः
मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी सुरू असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. सारथीला स्वायत्तता प्रदान करावी. याबाबत दखल न घेतल्यास मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अकोले शाखेच्या वतीने देण्यात आला.
      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारथी ही संस्था सरकारने मराठा कुणबी समाजातील तरुणांना शैक्षणिक फायदा होण्यासाठी सुरू केली. परंतु त्यामार्फत आता लाभ मिळू नये, असे प्रयत्न सुुरु आहेत. हा राज्यातील मराठा कुणबी शेतकरी, कष्टकरी, कामगारांवर अन्याय आहे. गेल्या 9 महिन्यांपासून संस्थेचे कामकाज व्यवस्थित सुरु होते.
     दहा महिन्याच्या कालावधीमध्ये 250 मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये कोचिंग शुल्क व 13 हजार रुपये विद्यावेतन दरमहा देण्यात येत आहे. आयबीपीएस बँकिग सेवा परीक्षेसाठी राज्यात सारथीमार्फत बारा ठिकाणी 586 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तर एमफील आणि पीएचडीकरिता 503 विद्यार्थ्यांना फेलोशिप, दरमहा 31 हजार ते 35 हजार रुपये व त्या व्यतिरिक्त यूजीसीप्रमाणे लाभ मिळतो. 558 विद्यार्थ्यांना ज्युडिशिअल सर्व्हिसेस स्पर्धा परीक्षा तयारीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमार्फत मार्गदर्शन मिळते. गोवाच्या सहकार्याने 200 उमेदवारांचे कोचिंग क्लास सुरु आहेत. एमपीएससीसाठी पुणे येथे 125 विद्यार्थ्यांना नामांकित कोचिंग इन्स्टीट्यूटद्वारे कोचिंग सुरु आहे. कोचिंग फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुमारे सव्वा लाख ते दीड लाख व दरमहा नऊ हजार रुपये  देण्यात येत आहे.
       परंतु 21 नोव्हेंबर 2019च्या आदेशानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उपक्रमावर संस्थेतून खर्च करण्याला मनाई केली आहे. 3 डिसेंबर 2019 रोजी अध्यादेश काढून संस्थेच्या कारभारातील स्वायत्तेवर घाला घालण्यात आला आहे. मराठा समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना लाभ मिळू नये म्हणून संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न दिसून येत आहे, असा दावा मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे.
     आठ दिवसात संस्था सुरळीत झाली नाही तर राज्यातील शेतकरी मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा मराठा महासंघाचे अकोले शाखेचे राज गवांदे, भाऊसाहेब वाकचौरे, शिवाजी पाटोळे, शिवाजी कदम, ओम काळे, वर्षा चौधरी, अक्षय आभाळे, अमोल मोरे, कैलास जाधव, सूर्यभान गोर्डे, अशोक आवारी, किशोर धुमाळ, सुशांत वाकचौरे, बाळासाहेब कोकाटे, मिलिंद हुलावळे, बाळासाहेब पवार, ईश्‍वर वाकचौरे, नितीन ढगे, शंकर उगले, सुभाष देशमुख, नीलेश गवांदे, सागर फापाळे, कुलदीप देशमाने यांनी दिला आहे.