Breaking News

एनआरसी, एनपीआर देशातील गरिबांवरील टॅक्स


रायपूर ः देशातील परिस्थिती भयावह असून, शेतकरी आत्महत्या, अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती, बेरोजगारी या समस्याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत करण्याऐवजी, सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी कायद्याकडे लक्ष केंद्रीत करत आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे देशातील गरिबांवरील टॅक्स आहे व नोटाबंदी देखील देशातील गरिबांवरील टॅक्सच होता, अशी टीका काँगे्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे तीन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी गांधी बोलत होते.
देशाची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. शेतकरी आत्महत्या, अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती, बेरोजगारी या सर्व समस्या आज समोर आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की, जोपर्यंत देशातील सर्व नागरिकांना एकमेकांशी जोडले जात नाही, या समस्या संपणार नाहीत. तसेच, अगोदर जग म्हणत होते की, भारत व चीन एकाच गतीने पुढे जात आहे. मात्र आता जग भारतात हिंसा पाहत आहे, महिला रस्त्यांवर स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.