Breaking News

शिवनेरीवरुन उद्धव ठाकरे करणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा

मुंबई-पुणे हायपरलूपलाही स्थगिती मिळण्याची शक्यता

मुंबई
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि रखडलेली खातेवाटप यामुळे सरकारच्या कामकाजांवर परिणाम होतांना दिसून येत आहे. मात्र असे असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजप सरकारच्या काळातील अनेक कामांनाप बे्रक लावला आहे. तर दुसरीकडे शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आज गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरी गडावरुन शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता येत आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकर्‍यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे 60 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठया प्रमाणावर वाढणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक कामांना बे्रक लावला आहे. तसेच अनेक निर्णय पुन्हा तपासण्यात येत आहे. मुंबई-पुणे हायपरलूपला जुलै 2019 च्या मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून आधीच्या सरकारने मान्यता दिली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पही स्थगित होण्याची चिन्हे आहेत. अद्याप स्थगितीबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र ही शक्यता नाकारता येत नाही. याच सगळ्या पार्श्‍वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे विकासकामांना खिळ बसवणारे निर्णय घेत आहेत अशीही टीका भाजपाने केली. मात्र तरीही हा निर्णय झाला. आता हायपरलूप या प्रकल्पाचाही फेरविचार होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेणार आहेत. त्यांना या प्रकल्पाची माहिती देणार आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांना काही शंका असतील किंवा त्यांचे काही प्रश्‍न असतील तर त्यांचीही  उत्तरं ते आपल्या परिने देतील आणि हा प्रकल्प स्थगित होऊ नये यासाठी प्रयत्न करतील असेही दिसून येत आहे.


हायपरलूप तंत्रज्ञान?
हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या टयूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या टयूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे टयूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरून धावतात. टयूबमध्ये हवेचा प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून 28 ते 30 प्रवासी प्रवास करू शकतात. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे.