Breaking News

कायदेभंग रेड गॅझेट करणार प्रसिद्ध : अ‍ॅड. गवळी

अहमदनगर/ प्रतिनिधी : “सुधारित नागरिकत्व कायदा हा घटनाबाह्य असून, त्याला संविधान मान्यता देत नसल्याने मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शनिवारी (दि.28) वाडियापार्क क्रीडा संकुलात महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोदी ‘का’ फूस कायदेभंग रेड गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार आहे’’, असे प्रतिपादन अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी केले.
नुकतेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकिलांना याबाबत जागृती करण्यासह सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणांनी देशात आर्थिक मंदी आली आहे. नोटाबंदीचा निर्णय फुसका बार ठरला असून, यातून काहीच साध्य झाले नाही. हा सुधारित नागरिकत्व कायदा देखील फुसका बार असून, यामुळे देशातील बंधूभाव व एकात्मतेला तडा जाणार आहे. हा कायदा स्वच्छतागृहात टाकून देण्यासारखा असून, प्रत्येकाने स्वच्छतागृहाचे नामकरण देखील ‘का’ (सीएए) असे करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.
कॉ.बाबा आरगडे यांच्या हस्ते मोदी का कायदेभंग रेड गॅझेट प्रसिद्ध करण्यात येणार असून, या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, विठ्ठल सुरम, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल आदी प्रयत्नशील आहेत.