Breaking News

बौध्दांची जनगणना होणे गरजेचे : अ‍ॅड.भीमराव आंबेडकर


कराड / प्रतिनिधी : जे जे बौध्द झाले आहेत, त्यांची जनगणेमध्ये नोंद होणे गरजेचे असून यावरुनच भारतातील बौध्दांची संख्या स्पष्ट होवून बौध्दांच्या सोयी सुविधा प्राप्त करुन घेण्यास सोपे होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात बदल करण्याचे सुरु असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी जागृत रहावे, असे आवाहन भारतीय बौध्द महासभाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.भीमराव आंबेडकर यांनी केले.
कराड येथे भारतीय बौध्द महासभेच्या सातारा जिल्हा व कराड तालुका    यांच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण येथे आयोजित 20 व्या बौध्द धम्म परिषदेत ते बोलत  होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे होते. यावेळी मुंबई चैत्य भूमीचे पूज्य भन्ते सुमेध बोधी, भारतीय बौध्द महासभाचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, सचिव एन.एम.आगाणे, भिकाजी कांबळे,  मुंबई प्रदेश अध्यक्ष  डी.एम.कांबळे,  सांगली जिल्हाध्यक्ष साहेबराव लोखंडे, सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, चंद्रकांत खडाईत, व्ही. एस. गायकवाड, डॉ. मीनाताई इंजे, प्राचार्य सुरेश खराते, अरुण गायकवाड, उत्तम मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. भीमराव आबेडकर म्हणाले, 1956 पुर्वी भारत देशात बौध्दांची संख्या दीड ते दोन लाख होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा दिल्यानंतर पाच लाख संख्या बौध्दांची झाली आणि आज जवळ 25 लाखांहून जास्त आहेत. खर्या अर्थाने या देशात बौध्दांची संख्या 25 लाखांहून जास्त असली तरीही जनगणेवेळी त्यांची नोंद बौध्द असे न लिहिल्याने होत नसल्याने बौध्दांची प्रत्यक्ष संख्या स्पष्ट होत नाही, याची बौध्द बांधवांनी नोंद घेवून जनगणेवेळी आपली नोंद बौध्द अशी करुन घ्यावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधनामध्ये बदल करण्याचे धोरण सत्ताधार्यांकडून चालू असून ते हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी संविधानाबाबत जागृत असणे आवश्यक आहे. बौध्दांच्या पवित्र स्थळांवर इतर धर्मियांनी त्यांच्या प्रतिमा मांडून अतिक्रमण केल्याने मुळ बौध्द संस्कृतीचा विपर्यास करुन ती संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून पुरातन विभागातून माहिती घेवून ती पवित्र स्थळे बौध्दांचीच आहेत, ही कायम करण्यासाठी बौध्दांनी पुढाकार घेवून सरकारला आपल्या मागणीसाठी भाग पाडले पाहिजे.
त्यासाठी भारतीय बौध्द महासभेमार्फत पत्र व्यवहार झालेला आहे. प्रत्येक बौध्दांकडे बौध्द असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.