Breaking News

अवैध मद्यविक्री कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील राज्य उत्पादन नगर विभागामार्फत नववर्षानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार अधीक्षक पराग नवलकर यांनी  जिल्ह्यात धडक कारवाई करणार असून या कार्यवाहीत अवैध मद्यविक्री व वाहतूक रोखण्यासाठी 5 पथके व 2 भरारीपथके असे एकूण 7  पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. अवैध ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
नाताळ व नूतन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नेमलेल्या कोपरगाव विशेष पथकांनी दि.26 ला जेऊर कुंभारी व शिर्डी येथे अवैध मद्याची वाहन तपासणी करताना दारुबंदी गुन्हा अन्वेषण विभागाकडून दोन गुन्हे नोदविण्यात आले. यावेळी आरोपी  समाधान बाबासाहेब चव्हाण (मोहिनीराजनगर कोपरगाव), विजय भास्कर गोदढे (मुक्ताईनगर,कोपरगाव), किरण दीपक जाधव (लक्ष्मीनगर, शिर्डी) यांना अटक करुन त्याच्याकडून देशी-विदेशी मद्य एक टाटा कंपनीची इंडिका कार, 1 हिरो मेस्त्रो दुचाकी वाहने मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 1 लाख 60 हजार 264 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच देशी दारु 121 लिटर, विदेशी दारु 32 लिटर जप्त करण्यात आली.
पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर व उपअधीक्षक सी.पी.निकम यांच्या मार्गदर्शनासाठी कोपरगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भैयासाहेब घोरतळे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, धवल गोलेकर व जवान भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, वाहनचालक निहाल शेख हे सहभागी होते. या गुन्ह्याचा तपास मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या अंतर्गत निरीक्षक भैयासाहेब घोरतळे व दुय्यम निरीक्षक अजित बडदे करीत आहेत.
अवैध व सार्वजनिक  ठिकाणी  मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार तसेच ढाब्यांवर जागा मालकांविरुध्द सुद्धा गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणी करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य अथवा अवैध मद्यविक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18208333333 हा टोल फ्री आणि 8422001133 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे  राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.