Breaking News

कोल्हार भगवतीपूर बसस्थानक परिसरात खड्डे


कोल्हार/ प्रतिनिधी ः
कोल्हार भगवतीपूर येथील बसस्थानक परिसरात खड्डे पडले आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातील भुयारी गटाराचे पाईप फुटून हे खड्डे पडले आहेत. यामुळे एसटी बस या खड्ड्यांपासून चुकवण्याची कसरत बसचालकांना करावी लागत आहे. बसस्थानक परिसरात काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण केले नसल्याने बसस्थानकात बस येताच येथे धुळीचे लोट उठतात. याचा त्रास बसस्थानकातील प्रवाशांना तर सहन करावा लागतोच परंतु बसमधील प्रवासीही यामुळे त्रस्त होतात. या बसस्थानकात प्रवाशांना बसण्याचीही धड  सोय नाही.
 ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना बसस्थानकात उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागते. मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणी स्वखर्चाने ओटा बांधून प्रवाशांची बैठक व्यवस्था केली होती. परंतु ठेकेदाराने मात्र याकडे दुर्लक्षच केले. बसस्थानकात सायंकाळी पाचनंतर बसेस आत न येता बसस्थानका बाहेरून निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो.
बसस्थानक की मद्यपींचा अड्डा...
बसस्थानकाची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे असल्याने रात्री मद्यपी येथे मद्यपान करण्यासाठी येतात. त्यामुळे हे बसस्थानक की दारूचा अड्डा, असा प्रश्‍न पडतो. अशा एक ना अनेक समस्यांमुळे बीओटी तत्त्वाचे हे बसस्थानक दयनीय झाले आहे.
 संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष घालून या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी कोल्हारकर नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.