Breaking News

पंकजा मुंडे यांची विरोधीपक्षनेतेपदी लागणार वर्णी !

Pankaja Munde
मुंबई
भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, स्वपक्षांतील नेत्यांनीच घात केल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे नाराज होत्या. त्यातच त्या 12 डिसेंबर रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशांच्या चर्चांना उधाण आले होते.
नाराज पंकजा मुंडे यांची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर निवड करून त्यांना विरोधीपक्ष नेता म्हणून निवड करण्याचे संकेत भाजपच्या गोटातून प्राप्त होत आहे. राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्षावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. भाजपने नरमाईची भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजप विरोधात बसले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली आहे. दरम्यान भाजप सत्तेत येऊ न शकल्याने माजीमंत्री पंकजा मुंडे पेचात अडकल्या आहेत. या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांना विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदाची संधी मिळू शकते. याआधी धनंजय मुंडे विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी होते. धनंजय मुंडे यांना या पदाचा राज्यभर आपला संपर्क निर्माण करण्यासाठी फायदा झाला होता. किंबहुना परळीतून विजय मिळवणे त्यांना सोपे झाले होते. आता भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असे झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभेच्या निकालानंतर त्यांच्या अस्वस्थेत भर पडली. परळीत त्यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. सर्व राज्यात लक्षवेधी ठरलेली ही लढत गाजलीही होती. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असा दावा करणार्‍या पंकजा मुंडे यांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्या अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगत त्यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतर्गत राजकारण आणि पक्षात कमी होत जाणारे महत्त्व यामुळे पंकजा मुंडे या नाराज आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितले जात आहे.
सुरूवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. त्याची चर्चाची अनेकदा झाली. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की प्रकरणात अनेक आरोप केल. त्या आरोपांना भाजपमधल्याच काही लोकांनी खतपाणी पुरवले असे त्यांना वाटते होते. त्यानंतर त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये फारसे सख्य राहिले नाही असे बोलले जात आहे. विधानसभेतल्या पराभवाला भाजपमधल्याच काही लोकांनी बळ पुरवले.त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे असे पंकजा मुंडे यांना वाटते. त्यामुळेच पंकजा मुंडे भाजप सोडण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहेत. मात्र 12 डिसेंबरपूर्वीच जर पंकजा मुंडे यांचे बंड शमविण्यात भाजप यशस्वी ठरला तर ठीक, अन्यथा पंकजा मुंडे राजकीय भुकंप करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.


पक्षांतर्गत विरोधामुळे बंडाच्या तयारीत
पक्षांतर्गत राज्यात पंकजा मुंडे यांचे प्रस्थ मोठे होऊ नयेत, यासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाने पुरेपूर काळजी घेतली असल्याची खदखद पंकजा मुंडे यांच्या मनात आहे. शिवाय देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या मदतीने अजित पवारांशी संधान साधले याची चर्चा आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे या नाराज आहेत. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि पंकजामध्ये विस्तव जात नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षात दबाव निर्माण करण्यासाठी पंकजा मुंडे यांची ही खेळी असल्याचे देखील बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना आता विधान परिषदेवर यायचे आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे देखील बोलले जात आहे.