Breaking News

कर्जबाजारी शेतकरी अंत्यसंस्कारांचे साहित्य घेऊन मुख्यमंत्र्याच्या भेटीला


मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरी नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍यांना शेतकर्‍यांसाठी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही कोणतेच धोरण निश्‍चित केलेल नाही. असाच एक नांदेडमधील शेतकरी आपल्या कर्जांची कैफियत मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आला होता.
डोक्यावर बँकेचे 17 लाखांचे कर्ज आहे, त्यातच बँक प्रशासनाकडून पिळवणूक सुरु आहे. धनाजी वसंतराव जाधव असे या शेतकर्‍याचे नाव आहे. या कर्जबाजारी शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येताना सोबत अंत्यसंस्काराचे साहित्यही आणल्यानं याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे.शेतकरी धनाजी वसंतराव जाधव यांच्यावर आयडीबीआय बँकेचं 17 लाख रुपयांचे कर्ज झाले. विशेष म्हणजे बँकेने 17 लाखांच्या कर्जापोटी शेतकर्‍याची तब्बल 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची जमीन ओलीस ठेवल्याचा आरोप धनाजी जाधव यांनी केला आहे. जमीन विकून बँकेचे कर्ज फेडण्याची इच्छा आहे. पण बँक ना जमीन विकू देते, ना जमिनीची कागदपत्रे देते, अशी तक्रार शेतकरी जाधव यांनी केली. धनाजी जाधव यांचे वडील मध्यंतरीच्या काळात कॅन्सरने वारले. त्यांच्या औषधोपचारात ते अगदी कर्जबाजारी झाले. हातउसणे घेतलेल्या पैशांसाठी त्यांच्यामागे अनेकांनी तगादा लावला. त्यातच मुलगा 10 वीच्या वर्गात शिकत होता. अशा परिस्थितीत जाधव यांनी आयुष्याचा शेवट करण्याआधी अखेरचा मार्ग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला.