Breaking News

भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती चिंताजनक

महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून स्पष्ट

Indian Railway
नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असून जीडीपी सातत्याने कमी होतांना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वे देखील नाजूक अर्थव्यवस्थेतून जात असल्याचे समोर आले आहे. दहा वर्षांत कधी नव्हे ती, इतकी रेल्वेची कमाई खालावल्याचे समोर आले आहे.
भारतीय रेल्वेचा आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 98.44 टक्के नोंदवला गेला आहे. जो मागील 10 वर्षांतील सर्वांत वाईट आहे. कॅगच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. याचाच अर्थ रेल्वेने 100 रुपये कमावण्यासाठी 98.44 रुपये खर्च केले. या अहवालानुसार, भारतीय रेल्वेचे परिचालन अनुपात आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 98.44 टक्के राहण्याचे मुख्य कारण हे मागील वर्षी 7.63 टक्के संचालन खर्चाच्या तुलनेत उच्च वृद्धी दर 10.29 टक्के होता. रेल्वेने अंतर्गत महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण सकल आणि अतिरिक्त अर्थसंकल्पीय साधनांवरील निर्भरता रोखली जाऊ शकते, असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षादरम्यान रेल्वेकडून करण्यात आलेल्या भांडवली खर्चात कपात करण्यात आली आहे. रेल्वेला मागील दोन वर्षांत आयबीआर-आयएफ अंतर्गत जमा करण्यात आलेला निधी खर्च करता आलेला नाही.
एकीकडे मोदी सरकार देशात बुलेट ट्रेन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक भारतीय रेल्वे गेल्या दहा वर्षांतील सर्वांत वाईट स्थितीला सामोरी जात आहे. महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कॅगच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाई सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली आहे. रेल्वेला केवळ एक रुपया 56 पैशांचा फायदा होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही सर्वात वाईट स्थिती आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्या सर्व सेवा-सुविधांमधून रेल्वे 2 टक्के पैसे देखील कमावू शकत नाही. कॅगच्या अहवालानुसार, रेल्वेची स्थिती वाईट होण्यामागे गेल्या दोन वर्षात आयबीआर-आयएफमार्फत जमा केलेल्या पैशाच्या वापर न होणे हे देखील कारण कॅगने सांगितले आहे. रेल्वेला भांडवली बाजारातून मिळालेल्या निधीचा पूर्ण वापर कसा करायचा याची आखणी करावी लागेल, असेही या अहवालात म्हटले आहे.


कॅगच्या अहवालानूसार रेल्वेच्या कमाई
आर्थिक वर्ष 2008-09 मध्ये रेल्वेचा ऑपरेटिंग खर्च 90.48 टक्के 2009-10 मध्ये 95.28 टक्के, 2010-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85 टक्के, 2012-13 मध्ये 90.19 टक्के 2013-14 मध्ये 93.6 टक्के, 2014-15 मध्ये 91.25 टक्के, 2015-16 मध्ये 90.49 टक्के, 2016-17 मध्ये 96.5 टक्के आणि 2017-18 मध्ये 98.44 टक्क्यांवर पोहोचला होता.


ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत नको

महालेखा परीक्षक (कॅग) यांनी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाऊ नये, अशी शिफारस केली आहे. कॅगच्या या अहवालात कर्करुग्ण, दिव्यांगांसह इतर प्रवाशांना ही सूट दिली जाऊ नये, असे म्हटले आहे. रेल्वे अधिकारी-कर्मचार्‍यांकडून विशेष यात्रेच्या पासच्या दुरुपयोगावर अंकुश न ठेवल्यावरही कॅगने रेल्वे मंडळावर नाराजी व्यक्त केली आहे.