Breaking News

खेळामुळे बौद्धिक विकासासह शारीरिक विकास:कोल्हे


  कोपरगाव/ ता.प्रतिनिधी

 सामाजिक माध्यमांमुळे तसेच इतर भौतिक सुख- सोयींमुळे सध्याच्या पिढीची जीवनशैली बदलली आहे. शारीरिक कष्ट अतिशय कमी झाले आहे. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून आपल्या देशाला प्रगती पथावर घेवून जाण्यासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम नागरिक तयार झाले पाहिजे. म्हणून बौद्धिक शारीरिक विकासासाठी युवकांनी अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व द्यावे, खेळामुळे बौद्धिक विकासासह शारीरिक विकास होईल असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
 संजीवनी सैनिकी स्कूल ज्युनिअर काॅलेजच्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. के.एल. दरेकर, क्रीडा संचालक प्रा. एन. बी. शिंदे, प्रा.बी.एन.शिंदे, वीरूपक्ष रेड्डी आदी उपस्थित होते. क्रीडा सप्ताहा दरम्यान कबड्डी, खो-खो, फुटबाॅल, व्हालीबाॅल, बास्केटबाॅल, पोहणे, धावणे, भाला फेक, गोळा फेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्राॅसकंट्री अशा  विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.
 कोल्हे पुढे म्हणाले की खेळामुळे शारीरिक क्षमते बरोबरच व्यक्तीतील खिलाडू वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आदी महत्वाच्या गुणांचा विकास होतो. त्याचा फायदा व्यक्ती बरोबरच देशालाही होतो. खेळाडू कोणतेही अपयश सहजपणे पचवू शकतात. या अनुषंगाने  संजीवनीच्या सर्व विद्या शाखांमध्ये खेळाला प्राधान्य दिले गेले आहे.