Breaking News

धनजंय मुंडेच्या नावाला प्रदेशाध्यक्षपदासाठी पसंती


मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी 30 डिसेंबरला होऊ घातला आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या आमदारांनी मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते धनजंय मुंडे देखील उत्सुक आहेत. मात्र राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व धनजंय मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. 
काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सभा गाजवणारे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वगुणांचा पक्षाच्या संघटनासाठी फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख आहे. परळीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभा गाठली. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा निश्‍चित मानला जात होता. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या भगवानगडावर येण्यासाठीही धनंजय मुंडेंना निमंत्रण मिळालं. स्वतः धनंजय मुंडे यांनीच सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. पण पक्ष धनंजय मुंडे यांना वेगळीच जबाबदारी देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे काँग्रेस आता राज्याची धुरा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्त्व करावे, अशी इच्छा खुद्द काँग्रेस हायकमांडचीच असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 24 डिसेंबर रोजी होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार काँगे्रसने केलेल्या विलंबामुळे झाल्याचे समोर आले आहे. काँगे्रस पक्षनेतृव दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपद देण्यास इच्छूक नाहीत. तर दुसरीकडे दोन्ही माजी मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. अशावेळी सोमवारी होऊ घातलेला मंत्रिमंडळाचा विस्तारामध्ये अनेक नेत्यांना संधी मिळणार नाही. त्याचवेळी त्यांच्यावर पक्षसंघटनांची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.