Breaking News

अकोले तहसील कार्यालयावर मूकमोर्चा


अकोले/प्रतिनिधी ः
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी अकोले शहरात विविध पक्षीयांच्या वतीने मंगळवारी निषेध मूकमोर्चा काढण्यात आला.  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
        सीएए व सीएबी कायदा रद्द करावा व एनआरसी कायदा आणू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकाळी 11 वाजता संगमनेर रोडवरील महाराजा लॅान्सपासून विविध पक्षांच्या मोर्चाला सुरवात झाली.
  महात्मा फुले चौकात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर आला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. शेतकरी नेते डॉ. अजित नवले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, मीनानाथ पांडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, शिवसेनेचे माधव तिटमे, रिपाइंचे विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा वाकचौरे, कासम मणियार, अयाज शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना नागरिकत्व कायद्याला विरोध केला.
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, संदीप शेणकर, शांताराम संगारे, शकील बागवान, सोन्याबापू वाकचौरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते व मुस्लीम बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
तहसीलदार मुकेश कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.  समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहचवू, असे ते म्हणाले.
समाजकंटकांचा निषेध
नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर मोर्चे आंदोलने होत आहेत. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागत आहे. संरक्षण करणार्‍या पोलिस बांधवांवर झालेल्या दगडफेकीचा अकोले मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध करतो. दंगल घडविणार्‍या, वाहने फोडणार्‍या समाजकंटकांचाही आम्ही निषेध करतो, असे मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नेते अयाज म्हणाले.