Breaking News

शेतकर्‍याच्या आयुष्याचे चिपाड होऊ नये ! मुख्यमंत्री ;कमी आमदारांवर सरकारही बनवता येते हे पवारांनी शिकवले
पुणे : सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळे केले जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केले आहे, असे उद्गगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी काढले. 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, लहानपणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. ऊसाची गुर्‍हाळं नाक्यावर असायची. ऊनात गार ऊसाचा रस पिऊन बरे वाटायचे. पण गुर्‍हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसर्‍या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचे लक्ष नसायचे. मात्र आज दुसर्‍याच्या आयुष्यात गोडवा वाटत असतांना शेतकर्‍यांच्या आयुष्य चिपाडासारखे होऊ नये. जर आम्ही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43 व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते-पाटील, इंडियन शुगर इन्स्टिट्यूटचे रोहित पवार, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, की शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारच्यावतीने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले, की प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकासामध्ये विशेष लक्ष द्यावे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साखर व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. राजकीय फटकारे आणि भाजपावर टीका करण्याची संधी देखील मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुरस्कार मिळवणार्‍या शेतकर्‍यांचे कौतुक करताना तुम्ही ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतले, त्याप्रमाणे शरद पवारांसोबत आम्ही कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करुन दाखवला असल्याचे म्हटले. जागा जास्त आहे, आमचेच पीक येणार असे कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करु शकतो हे दाखवून दिले आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा अस्त्तिवात आणल्याशिवाय राहणारच नाही असे आश्‍वासन दिले.चौकट . . . .
मुख्यमंत्री शब्द पाळतील ः शरद पवार
शरद पवार म्हणाले, मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटसाठी जागा दिली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्या आश्‍वासनांची त्यांनी अद्याप पूर्तता केली नाही. जे मुख्यमंत्री आश्‍वासनांचा शब्द पळत नाहीत अशांसोबत संघर्ष करण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे आता हे मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील. आपले सरकार आता जालना येथे निश्‍चितपणे ऊस संस्था उभारेल. ऊस उत्पादक कारखान्याला आपण सन्मानित केले आहे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. कारण यापूर्वी देशात आपण साखर उत्पादनात क्रमांक एक वर होतो. आता उत्तर प्रदेश क्रमांक एक वर असून आपण दुसर्या क्रमांकावर आलो आहोत, असे होता कामा नये. या स्पर्धेत जर कोणी आपल्या पुढे जात असेल तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण दर एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे पवार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले.


चौकट .. .
‘मी आजही राष्ट्रवादीसोबतच ः विजयसिंह मोहिते
विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सहा महिन्यानंतर शरद पवार आणि मोहिते यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले, मी आजही पवारांसोबतच आणि राष्ट्र्वादीसोबतच आहो. निवडणुकीनंतर त्यांना तीनदा भेटलो. असे विधान त्यांनी केले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.