Breaking News

पुणतांबा रस्त्यावर महिनाभरातच खड्डे


कोपरगाव/ प्रतिनिधी ः
पुणतांबा मार्गावरील खड्डे बुजविण्यास मागील महिन्यातच सुरुवात झाली परंतु या रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांची मालिका पहायला मिळत आहे.
  तालुक्यात सध्या एकही रस्ता खड्ड्याविना दिसत नाही. गतकाळात बांधकाम विभागाने कामाचा दर्जा न सांभाळल्यामुळे रस्त्यांची ही अवस्था झाली आहे.
 सर्वच रस्ते खचून रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडल्यामुळे मुख्य तीन रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला दीड कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्यातील सात लाख रुपये पुणतांबा चौफुली ते तळेगाव रस्त्यासाठी आहेत. मागील महिन्यात पुणतांबा मार्गावरील खड्डे बुजवण्याला बांधकाम विभागाने सुरुवात केली. परंतु या मार्गावरील खड्ड्यांची परिस्थिती  पुन्हा जैसे थे झाली आहे.
          नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव ते सावळीविहिरपर्यंतचा रस्ता, पुणतांबा चौफुली ते तळेगाव मळे, पुणतांबा, कोळपेवाडी, पोहेगाव या मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर  झाल्याचे बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाघचौरे यांनी सांगितले. त्यातील पुणतांबा चौफुली ते तळेगाव मळे या मार्गावरच सात लाख रुपये खड्डे बुजवण्यासाठी मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. वर्दळीच्या  पुणतांबा मार्गावरील खड्डे महिन्यापूर्वी बुजवले असले तरी या मार्गावरील खड्ड्यांची खडी महिनाभरातच उखडली असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.
 बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. खड्डे बुजवण्याचा निधी निरर्थक जातो की काय, अशा चर्चा नागरिकांमधून होत आहेत. पुणतांबा चौफुली ते झगडेफाटा रस्त्याची अवस्था तर अतिशय दयनीय झालेली आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे छोटेमोठे अपघातही वाढले आहेत. मुख्य महामार्गाशिवाय तालुक्यातील कुठल्याही रस्त्यावरील खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत.