Breaking News

देशात जालियानवाला बाग घडवण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका 

नागपूर -  देशात अशांतता आणि अस्वस्थततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्ली विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बाग पुन्हा घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसेच वातावरण देशात पुन्हा निर्माण केले जात आहे की काय अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 
जामिया विद्यापीठात जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच असून, ज्या देशात तरुण बिथरतो तो देश कधीच स्थिर राहू शकत नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तरुणांना बिथरवू नका तेच आपल्या देशाच्या भविष्याचा आधार आहे. केंद्राने तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नये, असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पुढे असे सांगितले की,  सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला मी नम्र आवाहन करतो की विधीमंडळाच्या परंपरेला काळीमा फासली जाईल असे काम कोणीही करुन नका. तुमचे प्रश्‍न मांडा आमच्याकडून उत्तरे दिली जातील. आमदारांनी सभागृहात समस्या ठेवणे अपेक्षित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  सामनाच्या अग्रलेखाची पोस्टर्स झळकावणार्‍या भाजपवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ’आम्ही सामना बघत नाही, आम्ही सामना वाचत नाही, अशा लोकांना सामना हातात घेऊन दाखवावा लागला. सामना वाचला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, चोरुन सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर त्यांना कळाले असते, असे देखील त्यांनी सांगितले.  शेतकर्‍यांना दिलेला शब्द मी पाळणार आहे. शेतकर्‍यांसाठी मी स्वत: रस्त्यावर उतरलो आहे. लोकांना माहिती आहे की आम्ही दिलेले वचन पाळणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, इथे  शेतकर्‍यांसाठी गळा काढणार्‍यांनी केंद्रात जाऊन गळा मोकळा करावा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच, जर शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा. राज्य सरकारच्या नावाने करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नका 
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात सध्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. केंद्र सरकारने ही आंदोलने चिरडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली. ’देशातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. युवाशक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात सर्वत्र शांतता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.