Breaking News

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कोठला येथून मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी :  नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात शहरातील कोठला येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य स्वरुपात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे शहरातील रहिवाशांनी एकत्र येऊन नागरिक दुरुस्ती विधेयकाची निंदा केली. या मोर्चामध्ये सामील झालेल्या लोकांनी देशाचे राष्ट्रीय ध्वज, वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनेचे ध्वज घेऊन लोक सामील झाले होते. तसेच त्यांच्याकडे या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अबुल कलाम आजाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो घेऊन नागरिक घोषणा देत होते. राष्ट्रपुरुषांचे वेशभूषा धारण करून लहान मुलेही या मोर्चामध्ये मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. यावेळी इन्कलाब जिंदाबाद, इस देश के चार सिपाही हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई, संविधान बचाओ- देश बचाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत हा सर्व धर्मीयांना समान रितीने धर्माचा मानदंड म्हणून वापरण्याची इच्छा असणारा देश असून नागरिकत्व विधेयक दुरुस्तीमुळे इतिहासात आमूलाग्र खंड पडून हा कायदा घटनेच्या मूलभूत संरचेनशी विसंगत असेल. भारतीय राज्य घटनेच्या 14 आणि 15 व्या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला समान मानण्यासाठी, धर्म-जातीच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक संविधानाच्या भावनेचे उल्लंघन करणारे आहे.’’
जनतेने असंवैधानिक आणि काटेकोर विधेयक नाकारुन न्यायप्रेमी आणि धर्मनिरपेक्ष लोकांना एकत्रितपणे आवाज उठवून आणि त्याची अंमलबजावणी थांबविण्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी प्रत्येकाने शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गावर काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या कायद्यामुळे अन्याय आणि जातीयता वाढीस लागण्याचा धोका असल्याचे सूचित करण्यात आले असून यास आळा घालण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मौलाना अन्वर नदवी म्हणाले, “मोर्चे व आंदोलनाची सरकारने पुरेशी दखल घेतली नाही तर देशात प्रत्येक शहरातून मोठ्या संख्येने जेलभरो आंदोलन करण्यात येईल.
या मोर्चामध्ये जमाते उलमा ए हिंदचे मौलाना ईर्शादुलाह कासमी, अहले सुन्नत वल जमात मुफ्ती शाहजहां, तबलीग जमातचे अब्दुस सलामभाई, संभाजी ब्रिगेडचे तिलक भोस, अहले हदीसचे मौलाना जमीर, बहुजन क्रांती मोर्चाचे म्हस्के, जमाअत ए इस्लामीचे अख्तर इंजिनियर, जमाआते मेहंदवी, वहदत ए इस्लामी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व जमीयते उलमाए हिंदचे मौलाना अन्वर खान नदवी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), बहुजन क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, नगर इतिहासप्रेमी मंडळ, रहमत सुलतान फाउंडेशन, अल्पसंख्याक प्रबोधन मंच, उर्जिता फाउंडेशन व शहरातील अनेक सामाजिक चळवळीतील संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.