Breaking News

सुरेगावच्या सुषमाचा आंतराराष्ट्रीय फॅशन डिझाईनिंग स्पर्धेत करिष्माकोपरगाव / ता.प्रतिनिधी
 वडील रात्रंदिवस रिक्षा चालवतात.. आई-वडिलांचे शिक्षण जेमतेम.. मुलीला शिक्षणाची, फॅशन डिझाईनिंगची आवड.. यावर मात करत थोडाफार पैसा गाठीशी बांधत तिने कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाईनिंग स्पर्धेत सहभाग घेतला.. आणि त्या ठिकाणी जगात तिसरा क्रमांक मिळवीत १ लाख १७ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले..
 ही यशोगाथा आहे कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील कन्या सुषमा अंबादास सोनावणे या विद्यार्थिनीची. सुषमाने आपली फॅशन डिझाईनिंगची आवड जोपासत आणि कठीण परिस्थितीवर मात करत कॅनडा येथे नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होत जगात तिसरा तर भारतात पहिला क्रमांक मिळविला. तिला जपानमधील हॉंगकॉंग येथे दोन वर्षाचा अभ्यासक्रम शिकायचा आहे. परंतु आर्थिक परिस्थिती तिला आडवी येत आहे. 
 सुषमाचे प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती संभाजी विद्यालय कोळपेवाडी येथे चौथीपर्यंत झाले. त्यानंतर पाचवी ते बारावी चे शिक्षण राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी   येथे झाले. गुण चांगले मिळाल्याने तिने यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला टेक्स्टाईल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं होतं, त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील दत्ताजी कदम टेक्स्टाईल इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तेथे ती आता बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
शिक्षण घेत असतानाच तिने डिझाइनिंगच्या अनेक स्पर्धेत यश मिळवले. सध्या बेंगलोर येथे तिचे प्रशिक्षण सुरू आहे. वडील अंबादास रंगनाथ सोनवणे यांचे शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत. सुरुवातीला ते गोदावरी खोरे दूध संघात चालक म्हणून काम करत होते. त्यानंतर ते राज्य परिवहन महामंडळात नाशिक येथे १२ सप्टेंबर १९८४ रोजी चालक म्हणून नोकरी करू लागले. पण मुलांच्या शिक्षणात नोकरी आड येत असल्याने त्यांनी २० जून १९९४ रोजी एसटी महामंडळाच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यात मिळालेली पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी लावली. 
 सुषमाच्या या यशाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ.स्नेहलता कोल्हे. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, राजेंद्र कोळपे, निशांत वाबळे आदींनी अभिनंदन केले आहे.