Breaking News

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या उपसरपंचास जीवे मारण्याची धमकी
 नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या उपसरपंचास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 गोधेगाव येथील उपसरपंच गोपीचंद जगन्नाथ पल्हारे यांनी नेवासे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गोधेगाव येथील शिवारात अबुज अनभुले यांच्या जमिनीच्या बांधावरून कंपाऊंडचे पोल मोडला म्हणून वाद सुरू असतांना उपसरपंच गोपीचंद पल्हारे यांनी उपसरपंच या नात्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पठाडे यांना घेऊन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विक्रम श्रीधर अनभुले अजय श्रीधर अनभुले या दोघांनी तू आमच्या बांदावर का आला म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
 या बाबत पोलिसांनी विक्रम अनभुले अजय अनभुले यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२३, ५०४,५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.