Breaking News

अजित पवारांच्या क्लीन चीटला नवे वळण 
मुंबई/पुणे : कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट दिली आहे. पण आता विभागाचे संचालक परमबीर सिंग यांनी या संदर्भात आधी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर नवी माहिती दिली आहे.
विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडील एका महत्त्वाच्या पत्रव्यवहाराकडे विभागातील आधीच्या अधिकार्‍याने दुर्लक्ष केल्याचे परमबीर सिंग यांनी नव्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे 26 मार्च 2018 चे एक पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावतीतील अधिकार्‍यांना मिळाले. या पत्रासोबत 20 मार्च 2018 चा एक अहवालही होता. यामध्ये विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या नियम 25 चा उल्लेख करण्यात आला आहे. या नियमाचा आधार घेऊन त्यावेळी या संबंधीच्या सर्व फाईल्स राज्य सरकारकडे न पाठविता थेट तत्कालिन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या, असे म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आधीचे संचालक संजय बर्वे यांनी 26 नोव्हेंबर 2018 रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विदर्भ सिंचन विकास महामंडळाने दिलेले ते कारण फेटाळले होते. याच नियमाचा वापर करून अजित पवार यांचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे महामंडळाचे म्हणणे होते. पण संजय बर्वे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तो युक्तिवाद फेटाळला होता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या वैयक्तिक प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंग यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या पत्रव्यवहाराकडे आधीच्या संचालकांनी आवश्यक गांभीर्याने बघितले नाही, असे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन संचालकांनी विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या पत्रव्यवहाराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावल्याने आणि या संदर्भात वेगळे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने या संपूर्ण क्लीन चीटवर शंकेचे नवे ढग निर्माण झाले आहेत.
दरम्यान, तीन दिवसांसाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे म्हणणे चुकीचे आहे. ते काम प्रशासनाने दैनंदिन कामकाजाप्रमाणे केले, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले. कोथरूडमधील विकासकामांच्या उदघाटनांसाठी बुधवारी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शिवसेना मोठ्या भूमिकेत आहे. मागे त्यांनीही भाजपच्या खांद्याला खांदा लावून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांना अजित पवार दोषी दिसत नाहीत का असाही प्रश्‍न त्यांनी केला. पवार यांच्यावरील खटले मागे घेण्यासाठी नवीन सरकारने सूचना दिल्या की अधिकार्‍यांनी स्वतः केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.