Breaking News

नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात उद्रेक

उत्तरप्रदेशात हिंसक वळण 
 रामचंद्र गुहा, योगेंद्र यादव यांना अटक 
दिल्लीत जमावबंदी; इंटरनेट, मेट्रो सेवादेखील बंद
नवी दिल्ली/बेंगळुरु - नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी, विचारवंत, लेखक, साहित्यिक आक्रमक झाले असून, रस्त्यावर उतरुन आंदोलन करतांना दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून, अनेक भागात जाळपोळ करण्यात आली, तर अनेक ठिकाणी वाहनांना आगी लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी बेंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. तर दिल्लीमधून विचारवंत योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवणारे फलक दाखवत असताना पोलिसांनी रामचंद्र गुहा यांच हातांना खेचत, त्यांना ओढत अटक केली. पोलिसांची ही दडपशाही असल्याचे सांगत देशभरात आंदोलनकर्त्यांनी याचा निषेध केला आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. बंगळुरुत राम गुहा, दिल्लीत योगेंद्र यादव, विमलेंदू झा, डी राजा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील संभल येथे जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. आंदोलकांनी एका बसला आग लावली आहे. माहिती मिळताच अग्मिशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचून आग विझवली. दरम्यान दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आले असून 17 हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. पाटण्यात कन्हैय्या कुमार आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरला असून मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानातही आंदोलन करण्यात येणार असून सेलिब्रिटी, नेते जमणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. लखनऊतही कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
गुहा यांच्याबरोबर अरुंधती रॉय, देवदत्त पटनायक यांसारख्या अनेक प्रसिद्ध लेखक मंडळींनी या कायद्याविरोधातील आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे. गुरुवारी सकाळी बेंगळुरूच्या पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याचे, तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यावर इतिहासकार गुहा यांनी आपले मत व्यक्त केले होते. प्रिय पोलीस आयुक्त, तुमच्या सरकारच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय ठिकाणांना विद्रुप करून टाकले आहे, अशा शब्दांत गुहा यांनी पोलीस आयुक्तांना उत्तर दिले होते. भारतीय राज्य घटनेच्या तत्त्वांचे रक्षण करण्याची भूमिका घेणार्‍या सर्वच आंदोलकर्त्यांचे हे शांततेच्या मार्गाचेच आंदोलन होते. तुम्ही आम्हाला आणि आमचा आवाज दडपण्यासाठी वसाहतवादी युगातील कायद्याचा वापर केलात, असेही गुहा यांनी पोलीस आयुक्ताना उत्तर देताना म्हटले आहे. कर्नाटकात नागरिकत्व कायद्याविरोधात कोणत्याही प्रकारे आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. हा आदेश देत असताना पोलिसांनी बेंगळुरू शहरात आणि राज्यातील इतर भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी सकाळी 6 ते डिसेंबर 21 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. आज पहाटे ट्विट करत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी महात्मा गांधी यांचय्या सन 1919 मधील वचनाचा उल्लेख केला आहे. हिंदु आणि मुस्लिमांनी एकाच मातापित्याच्या मुलांप्रमाणे वागावे असे महात्मा गांधी म्हणाले होते.
दरम्यान, राजधानी दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे. भारती एअरटेल कंपनीची मोबाइल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, केंद्राने अशापद्धतीचे आदेश दिलेले असल्यास संपूर्ण दिल्लीत काही वेळात इतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांचीही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध करण्यात आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. देशातून या आंदोलनाला तरुणाईचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जनतेचा आवाज दाबण्याचे काम सुरू -  प्रियंका गांधी 
मोदी सरकारकडून देशातील जनतेचा आवाज दाबण्याचे काम सुरू असल्याचे ट्विट काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केले आहे. तर दिल्लीत इंटरनेट आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आल्याचीही माहिती प्रियांका यांनी ट्विटमध्ये दिली आहे. दिल्लीत आज कुणाला आवाज उठवण्याचीही परवानगी नाही, पण तुम्ही कितीही आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तरी तितकाच मोठ्या प्रतिकाराने आवाज आणखी बुलंद होईल, असंही प्रियंका यांनी म्हटले आहे.